Bangladesh Mustafizur Rahman: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानशी संबंधित वाद शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या कथित अत्याचारानंतर मुस्तफिजूरला IPL 2026 साठी Kolkata Knight Riders संघातून वगळण्यात आले आहे. यानंतर हा वाद केवळ क्रीडाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
या प्रकरणानंतर बांगलादेश सरकारने देशात IPL सामन्यांचे प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर T20 वर्ल्ड कप 2026 मधील भारतात होणारे बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणीही करण्यात आली. मात्र ICC ने ही मागणी फेटाळून लावली आहे.
पत्रकाराच्या प्रश्नावर मोहम्मद नबी संतापला
या संपूर्ण वादाचे पडसाद आता बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मध्येही उमटू लागले आहेत. अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी(Mohammad Nabi) याला एका बांगलादेशी पत्रकाराने मुस्तफिजूरच्या IPL वादावर प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच नबी चिडला.
या घटनेचा माझ्याशी काय संबंध?
पत्रकाराच्या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया देताना नबी म्हणाला, "भाई, या घटनेचा माझ्याशी काय संबंध आहे? मुस्तफिजूरशी माझा काय संबंध? राजकारणाशी मला काही देणेघेणे नाही. मला एवढेच माहीत आहे की, तो एक चांगला गोलंदाज आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारत आहात, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय चर्चेचा भाग बनू इच्छित नाहीत."
ही घटना नोआखली एक्सप्रेस आणि ढाका कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत घडली. नबी आपल्या 19 वर्षीय मुलगा हसन ईसाखिलसोबत नोआखली संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
ICC कडे बांगलादेशचे दुसरे पत्र, अजून उत्तर नाही
दरम्यान, Bangladesh Cricket Board (BCB) ने ICC कडे दुसरे अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात भारत दौऱ्यातील सुरक्षेवर चिंता आणि T20 वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी करण्यात आली आहे. हा विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, बांगलादेशला भारतात चार सामने खेळायचे आहेत. मात्र आतापर्यंत ICC कडून या पत्रावर कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही.
7 फेब्रुवारीला पहिला सामना
सर्व अनिश्चिततेनंतरही बांगलादेशने आपला T20 वर्ल्ड कप संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या Eden Gardens मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. बांगलादेश इंग्लंड, इटली आणि नेपाळ यांच्यासोबत ग्रुप C मध्ये आहे.