गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यापूर्वी या नव्यानं उभारण्यात आलेल्या या स्टेडिअमचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आलं असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलेंआहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावानं ओळखलं जाईल. दरम्यान, या स्टेडिअमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडिअम असं का ठेवण्यात आलं यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उद्घाटन बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. उद्घाटनादरम्या अमित शाह यांनी या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी यांच्या नावावार का ठेवलं याची माहिती दिली. "आम्ही या स्टेडियमचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदींचा एक ड्रिम प्रोजेक्ट होता. गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवत असताना त्यांनी हे स्पप्न पाहिलं होतं. जे आता साकार झालं आहे. नवं स्टेडियमला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हायटेक स्टेडियमच्या धर्तीवर उभारण्यात आलं आहे. अहमदाबाद आता स्पोर्ट्स सिटीच्या नावानंही ओळखली जाईल," असं अमित शाह म्हणाले.
हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचा भाग आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपं जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. याशिवाय जिमसह चार ड्रेसिंग रूम्स आहेत.
मोटेरा स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे काम सध्या बीसीसीआय सचिव असलेले जय शाह हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना सुरू झालं होतं. या स्टेडियममध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षक सहज बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात.