भारतीय महिला संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला.
भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद १३४ चेंडूत १४ चौकारांसह १२७ धावांची नाबाद खेळी केली. आता फायनलमध्ये भारतीय संघाला विजेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करायचे आहेत.
भारतीय संघाने स्पर्धेत आतापर्यंत आपला दमदार खेळ दाखवला आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा संघही तुल्यबळ आहे. विशेष म्हणजे, कर्णधार लॉरा वोल्वार्ड ही तुफान फॉर्मात आहे. जाणून घेऊया तिचा रेकॉर्ड.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिला 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखलं जातं. सध्या सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत तिने आपल्या संघाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले आहे आणि संघ फायनलमध्ये आणला आहे.
सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत लॉरा वोल्वार्ड ही सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल आहे. तिच्या नावे ८ सामन्यांमध्ये ६७च्या सरासरीने ४७० धावा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची स्मृती मंधाना ९० धावांनी मागे आहे.
स्पर्धेच्या सेमीफायनलमध्येही लॉराने आपली तुफानी बॅटिंग दाखवून दिली आहे. इंग्लंडविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने २० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १६९ धावांची खेळी केली होती.
लॉरा ही सध्या केवळ २६ वर्षांची आहे, पण तिने वयाच्या १३व्या वर्षी आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील महिला संघातून सुरूवात केली होती. त्यामुळे तिला दीर्घकाळ क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे तसेच क्रिकेटमधील बदल तिने पाहिलेत.
लॉराने आतपर्यंत ११८ वनडे सामने खेळले असून ५,१२१ धावा केल्या आहे. १८४* ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. तिच्या नावे ३८ अर्धशतके आणि १० शतकांचा समावेश आहे. तसेच तिने ५७५ चौकार ठोकले आहेत.
लॉराला आंतरराष्ट्रीय क्रिकेट वगळता लीग स्पर्धांचाही पुरेसा अनुभव आहे. तिने विविध ११ संघांकडून लीग स्पर्धा खेळल्या आहेत. विविध खेळपट्ट्यांवर १३ वर्षे खेळत असल्याने तिला बड्या सामन्यांचा दांडगा अनुभव आहे.