टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय मैदानात कमालीची कामगिरी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलण्याचा यशस्वी डाव खेळला.
कोलकाता कसोटी सामन्यातील लो-स्कोअरिंग लढतीत तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. गुवाहाटीच्या मैदानात आपला हा तोरा कायम ठेवण्यासाठी त्यांनी तगडी कामगिरी करुन दाखवली. दक्षिण आफ्रिकेचा संघ २५ वर्षांनी पुन्हा टीम इडियाला क्लीन स्वीप करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
वर्णद्वेषी अपार्थाइड धोरणामुळे तब्बल २१ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हकालपट्टी झेललेल्या दक्षिण आफ्रिकेनं पुनरागमनाची नवी कहाणी भारतीय मैदानातूनच लिहिली. नोव्हेंबर १९९१ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या वनडे मालिकेतूनच प्रोटिअस संघानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम केले होते.
कसोटीचा विचार करता १९९६ मध्ये हान्सी क्रोन्येच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारत दौऱ्यावर ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही मालिका २-० अशी जिंकली होती.
२००० साली भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी द्विपक्षीय कसोटी मालिका खेळवण्यात आली. हान्सी क्रोन्येच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या कसोटी मालिकेत २-० अशी बाजी मारली अन् सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियावर घरच्या मैदानात क्लीन स्वीपची नामुष्की ओढावली.
२००४-०५ च्या दौऱ्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला १-० असे पराभूत केले होते. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व हे सौरव गांगुलीनं केले होते.
२००८ मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चेन्नईच्या मैदानातील सामना अनिर्णित राहिल्यावर अहदाबादच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण टीम इंडियाने ग्रेम स्मिथच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला कानपूरच्या मैदानात पराभूत करत मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवल्याचे पाहायला मिळाले होते.
२०१० मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ असा बरोबरीचा डाव साधला होता.
२००१५-१६ च्या दौऱ्यात भारतीय संघाने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० अशा विजय नोंदवला होता. २०२० मध्ये किंग कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ३ कसोटी सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप दिला होता. या दिमाखदार विजयासह कोहलीनं तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील क्लीन स्वीपचा हिशोब चुकता केला होता.