भारतीय संघाचा स्टार ऑफस्पिनर आर. अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली.
आर. अश्विन यानं १४ वर्षांच्या आपल्या यशस्वी कारकिर्दीला अनपेक्षितपणे ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले. एक नजर त्याने सेट केलेल्या केलेल्या खास रेकॉर्ड्सवर
आर. अश्विन याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६५ विकेट्सची नोंद आहे. अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा तो दुसरा गोलंदाज आहे.
कसोटी क्रिकेटमध्येही सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आर. अश्विन ५३७ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळे यांच्या खात्यात सर्वाधिक ६१९ विकेट्सची नोंद आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वात आधी १०० विकेट्सचा पल्ला गाठणारा आर. अश्विन हा पहिला गोलंदाज आहे. मार्च २०२२ मध्ये त्याने हा टप्पा पार केला होता. ICC चॅम्पियनशिप स्पर्धेतील तीन हंगामात त्याने सर्वाधिक १९८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
आर. अश्विन याने ३७ वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याबाबतीत फक्त श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन त्याच्या पुढे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ६७ वेळा ही कामगिरी करुन दाखवली आहे.
२५०, ३०० आणि ३५० विकेट्सचा टप्पा जलदगतीने पार करणारा अश्विन हा ५०० विकेट्सचा टप्पा जलदगतीने पार करणारा दुसरा गोलंदाज आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याने ९८ डावात ५०० विकेट्सचा पल्ला पार केला होता.
कसोटीत त्याने सर्वाधिक १२ वेळा मालिकावीर पुरस्कार पटकावला आहे. याबाबतीत फक्त विराट कोहली (२१ वेळा) आणि सचिन तेंडुलकर (२० वेळा) त्याच्या पुढे आहेत.
अश्विननं आपल्या कसोटी कारकिर्दीत २२६ बळी हे पायचित आणि त्रिफळाचितच्या रुपात घेतले आहेत. अन्य फिरकीपटूंच्या तुलनेत तो याबाबतीत सर्वात टॉपला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पायचित आणि त्रिफळाचितच्या रुपात सर्वाधिक बळी टिपणाऱ्या आघाडीच्या तीन गोलंदाजांमध्ये आर. अश्विनचा समावेश होता. त्याने ३०२ विकेट्स या या स्वरुपात घेतल्या आहेत. त्याच्याशिवाय या यादीत मुथय्या मुरलीधरन (३२६) आणि जेन्स अँडरसन (३२०) या दिग्गज गोलंदाजांचा समावेश होतो.
आर. अश्विन याने चार वेळा शतकी खेळीसह पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रमही करुन दाखवलाय. याबाबतीत फक्त इंग्लंडचा दिग्गज ऑलराउंडर इयान बॉथम पुढे आहे. ज्याने ५ वेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे.