सध्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला आहे. शुक्रवारी भारत अ आणि बांगलादेश अ या संघांमध्ये उपांत्य फेरीची लढत होत आहे. या सामन्यातील विजयी संघाला फायनलचे तिकिट मिळेल.
स्पर्धेचा अंतिम सामना २३ जुलै रोजी होणार आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून भारतीय संघाने वर्चस्व राखले आहे.
यश धुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात यूएईचा ८ गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव करून टीम इंडियाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी भिडली. साई सुदर्शनच्या नाबाद १०४ धावांच्या शतकी खेळीने भारताने मोठा विजय मिळवला. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात काही भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी केली.
भारताने ८ गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. लक्षणीय बाब म्हणजे या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय साकारला.
महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगर्गेकरने आशिया चषकाची स्पर्धा गाजवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. २ सामन्यांमध्ये ८ बळी घेणारा २० वर्षीय हंगर्गेकर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा असून त्याने २ सामने देखील खेळले आहेत.
२० वर्षीय मानव जगदुसकुमार सुथेर हा आशिया चषक स्पर्धेतील सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला आहे. साखळी फेरीतील ३ सामन्यांमध्ये त्याने ३.२८ च्या सरासरीने गोलंदाजी करून फलंदाजांची डोकेदुखी वाढवली.
साई सुदर्शन भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
साई सुदर्शनने ३ सामन्यांत १७० धावा केल्या आहेत. २१ वर्षीय साई सुदर्शनने पाकिस्तानविरूद्ध अप्रतिम फलंदाजी करून १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली.