प्रत्येक स्टेडियमची एक ठराविक क्षमता असते, मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी विक्रीला येणाऱ्या तिकिटांची संख्या त्यापेक्षा कितीतरी कमी असते. नागपूरच्या व्हीसीए जामठा स्टेडियमचे उदाहरण घेतल्यास, या स्टेडियमची एकूण क्षमता ४४ हजार आहे. मात्र, ऑनलाइन विक्रीसाठी केवळ ३० हजार तिकिटेच उपलब्ध केली जातात. उर्वरित १४ हजार तिकिटे सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाहीत.
उर्वरित १४ हजार तिकिटांचे वितरण कसे होते? स्टेडियममधील मोक्याच्या जागा आणि हजारो तिकिटे ही आधीच विविध कारणांसाठी राखीव ठेवलेली असतात. यामध्ये व्हीसीएच्या १,२०० सदस्यांसाठी तब्बल ६ हजार तिकिटे राखीव असतात. यामध्ये प्रत्येक सदस्याला एक मोफत आणि चार सशुल्क तिकिटे मिळण्याची सोय आहे.
तर प्रायोजक , विशेष पाहुणे, मीडिया प्रतिनिधी आणि व्हिआयपी लोकांसाठी ३ हजार तिकिटे मोफत वितरीत केली जातात. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि अन्य विशेष निमंत्रितांसाठी ५ हजार जागा राखीव ठेवल्या जातात.
जेव्हा ३० हजार तिकिटे ऑनलाईन विक्रीसाठी येतात, तेव्हा लाखो क्रिकेट प्रेमी एकाच वेळी वेबसाईटवर लॉगिन करतात. मागणी हजारो पटीने जास्त आणि उपलब्ध जागा मर्यादित असल्याने, तिकीट मिळवणे हे एखाद्या युद्धापेक्षा कमी उरलेले नाही.
तिकीट विक्रीची वेळ सुरू होण्याआधीपासून कोट्यवधी क्रिकेटप्रेमी संबंधित वेबसाइट किंवा अॅपवर लॉग-इन करतात. काही मिनिटांत वेटिंग काउंटरवर एक लाखाहून अधिक युजर्स दिसतात. इतक्या प्रचंड 'ट्रॅफिक'मुळे वेबसाइट किंवा अॅपवर जबरदस्त ताण येतो आणि काही वेळातच सिस्टम 'सोल्ड आउट' असा संदेश दाखवते. अनेकदा हा ताण सहन न झाल्याने सर्व्हर डाउन होतात आणि वेबसाइट कॅश होते.
वेबसाइट क्रैश होताच अनेक लोक तिकीट खरेदीचा प्रयत्न सोडून देतात. मात्र, काही 'समजूतदार' लोक चिकाटीने प्रयत्न करत राहतात. त्यापैकी काहींना नंतर, कधी कधी दुसऱ्या दिवशीदेखील तिकिटे मिळाल्याचे दिसून आले. यामागील कारण असे की, तिकिटे प्रत्यक्षात 'सोल्ड आउट' झालेली नसतात, तर अतिताणामुळे वेबसाइट क्रॅश झालेली असते. ज्यांनी संयम राखला, त्यांना त्याचा लाभ होतो.
ज्यांना तिकिटे मिळाली, त्यांपैकी अनेकांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन होते आणि ते जलद प्रोसेसिंग असलेली उपकरणे, जसे अॅपल लॅपटॉप किंवा सक्षम अँड्रॉइड मोबाइल वापरत होते. जलद नेटवर्क, वेगवान प्रोसेसर आणि तत्काळ पेमेंटचा पर्याय यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता बळावते.
या संपूर्ण यंत्रणेत काळाबाजार करणारे अतिसक्रिय असतात. जाणकारांच्या मते, रेल्वे तिकीट बुकिंगसारख्या ऑनलाइन प्रणालींचा दीर्घ अनुभव असलेल्या लोकांना तिकीट मिळविण्याच्या खास टिप्स माहीत असतात. हे लोक अनेक अकाउंट्स, वेगवान प्रोसेसर, जलद नेटवर्क आणि अचूक टायमिंगच्या जोरावर तिकिटे मिळवितात आणि नंतर ती चढ्या दराने ब्लॅक करतात.