सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. खूप उशीरानं टीम इंडियात संधी मिळालेल्या सूर्यानं फलंदाजीसह नेतृत्वाची खास छाप सोडली आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर सूर्यानं आपल्या कारकिर्दीला कलाटणी देण्यात पत्नी देविशाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे, असे सांगितले.
भारतीय कर्णधाराने सांगितले की, पत्नी देविशा हिने टोचून बोलत विचारलेल्या त्या एका प्रश्नामुळे नशिबाची आणि करिअरची दिशा बदलली.
ही गोष्ट २०१८ मधील आहे. सूर्या त्यावेळी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत होता. पण टीम इंडियाची जर्सी अजूनही दूर होती.
देविशाने त्यांचा दिनक्रम जवळून पाहिला आणि एक दिवस स्पष्टपणे विचारले, “तुझ्यासोबतचे अनेक खेळाडू भारताकडून खेळत आहेत, तुझा काय विचार आहे? जर भारतासाठी खेळायचे असेल, तर कसे खेळणार?”
सूर्या म्हणाला की, तिच्यासोबतची ही चर्चा वादाची गोष्ट नव्हती तर वास्तव दाखवणारी होती. तो प्रश्न मनाला टोचणारा आणि हादरून टाकणारा होता. त्यानंतर आम्ही दोघांनी बसून गोष्टी वेगळ्या पद्धतीने करायचं ठरवलं.
देविशासोबतच्या चर्चेनंतर जीवनशैली पूर्णपणे बदलली. डाएटसह वर्क शेड्यूलवर भर दिला. यात पत्नीने सूर्याची मदत केली. याचा फायदा असा झाला की, सूर्यानं मुंबई इंडियन्सकडून २०१८ चा हंगाम गाजवला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
सूर्या म्हणाला की घरी मी सुपरस्टार सूर्यकुमार नसतो. जेवण झाल्यावर स्वतःची प्लेट सिंकमध्ये ठेवावी लागते. देविशा मला नहेमी नम्र राहण्याची आठवण करून देते.