श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंका याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या हंगामातील पहिले शतक झळकावले. या शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा पाकिस्तानी फलंदाजाच्या नावे होता.
२०१४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उमर अकमल याने मिरपूरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९४ धावांची खेळी साकारली होती. हा विक्रम मोडीत काढत पथुम निसंका ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला शतकवीर ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी त्याने आपल्याच विक्रमाची बरोबरी करत श्रीलंकेकडून दुसरी सर्वात जलद सेंच्युरी साजरी केली. पल्लेकेलेच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५२ चेंडूत शतक साजरे केले. याआधी २०२५ मध्ये त्याने भारताविरुद्ध दुबईच्या मैदानात ५२ चेंडूत शतक साजरा केल्याचा रेकॉर्ड आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वात जलद शतकी खेळाचा रेकॉर्ड हा कुसल परेराच्या नावे आहे. २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नेस्लनच्या मैदानात त्याने ४४ चेंडूत शतक साजरे केले होते.
वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेकडून सर्वोच्च धावसंख्या करणारा निसंका हा महिला जयवर्धने याच्यानंतरचा दुसरा श्रीलकंन फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नाबाद १०० धावांची खेळी साकारली.
याआधी महिला जयवर्धने याने २०१० च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध १०० धावांची खेळी केली होती.
पथुम निसंका याने २०२१ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून श्रीलंकेकडून आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने छोट्या फॉरमॅटमध्ये ८७ सामन्यातील ८६ डावात २५७४ धावा केल्या असून यात २ शतकांसह १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील शतकी खेळीसह त्याने यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहे. तो हा फॉर्म कायम ठेवत श्रीलंकेच्या संघासाठी कितपत फायद्याचा ठरणार ते पाहण्याजोगे असेल.