भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव विश्वचषकात शानदार लयनुसार खेळत आहे. ऑस्ट्रेलियात रंगलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने 4 पैकी 3 सामने जिंकून उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. बांगलादेशविरूद्धचा सामना झाल्यानंतर सूर्यकुमार यादव पत्नी देविशासोबत सहलीला गेल्याचे फोटो समोर आले आहेत.
सूर्याने विश्वचषकात सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. प्रथम त्याने नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 51 धावांची खेळी केली. यानंतर कठीण परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 40 चेंडूत 68 धावा केल्या. मात्र चौथ्या सामन्यात बांगलादेशविरूद्ध तो 16 चेंडूत 30 धावांची खेळी करून बाद झाला.
दरम्यान, विश्वचषकाच्या रणधुमाळीत सूर्या त्याची पत्नी देविशासोबत अनेकवेळा सहलीला गेला आहे. हे कपल मेलबर्न, सिडनी आणि ॲडिलेड येथे फिरताना पाहायला मिळाले आहे. त्याचे फोटो सूर्या आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
देविशाने एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर करून सूर्याने आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सूर्याने देविशासोबतचा शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सूर्या आणि देविशा यांनी ऑस्ट्रेलियातही भरपूर शॉपिंग देखील केली आहे. त्यांच्या फोटोमध्ये दोघांच्याही हातामध्ये सामान दिसत आहे. या दोघांनीही ऑस्ट्रेलियाची ओळख असलेल्या कांगारूंसोबत फोटो काढले.
सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-20 क्रमवारीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. तो जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवने या यादीत मागील मोठ्या कालावधीपासून अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे.
सूर्याची देविशाशी पहिली भेट 2012 मध्ये मुंबईच्या पोद्दार डिग्री कॉलेजमध्ये झाली होती. तेव्हा सूर्या B.Com च्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता आणि देवीशा 12वी पास होती. तेव्हा सूर्याचे वय 22 वर्षे तर देविशा 19 वर्षांची होती.
कॉलेजमध्ये असतानाच सूर्याला देविशाचा डान्स खूप आवडला आणि तो तिच्या प्रेमात पडला. तर देविशा देखील सूर्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे प्रभावित झाली होती. तेव्हापासून दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये लग्न केले.