सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकत नवा इतिहास रचला. ICC स्पर्धेत सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवण्यासोबतच ट्रॉफीचा बचाव करण्यासोबतच घरच्या मैदानात ट्रॉफी उंचावण्याचा मोठा डाव टीम इंडियाने साधला.
इथं एक नजर टाकुयात भारतीय संघासह ICC स्पर्धेत सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या आघाडीच्या पाच संघांच्या रेकॉर्डवर
सूर्यकुमार यादवच्या आधी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांनी टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद मिळवून दिले होते. भारतीय संघ तिसऱ्या जेतेपदासह टी-२० स्पर्धेत किंग ठरला असला तरी ICC स्पर्धेत सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाच्या यादीत अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे.
आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन संघाच्या नावे आहे. १९८ मध्ये पहिली वनडे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवल्यावर १९९९, २००३, २००७, २०१५ आणि २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने छाप सोडली. सर्वाधिक ६ वनडे वर्ल्ड कपसह २ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२१ मध्ये टी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ च्या हंगामात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह ऑस्ट्रेलियाने १० ICC स्पर्धा गाजवल्याचा रेकॉर्ड आहे.
भारतीय संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली वहिली वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. महेंद्रसिंह धोनीने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसह टी-२० वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून दिले आहे. सर्वाधिक ३ वेळा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय संघाने २ वनडे ३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसह ८ वेळा ICC ट्रॉफी उंचावली आहे.
वेस्ट इंडिजच्या संघाने दोन वनडे वर्ल्ड कपसह दोन वेळा टी-२० स्पर्धा गाजवली आहे. याशिवाय चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदासह कॅरेबियन संघाने ५ ICC ट्रॉफीवर आपलं नाव कोरले आहे.
पाकिस्तानच्या संघाने वनडे वर्ल्ड कपसह टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसह ३ वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.
इंग्लंडच्या संघाने २०१९ मध्ये वनडे वर्ल्डसह २००९ आणि २०२२ मध्ये टी-२० वर्ल्ड कपसह तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.