तुटलेला जबडा, रक्ताच्या उलट्या, फ्रॅक्चर...; या क्रिकेटपटूंनी देशासाठी लावली जीवाची बाजी

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. खरं तर हा खेळ फुटबॉल आणि रग्बीसारखा संपर्क खेळ नसला तरी खेळाडूंना मैदानावर अनेकदा गंभीर दुखापती होतात. सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर खेळाडूंनी मैदान सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

खेळताना दुखापत होणे हे साहजिकच आहे. आपण अनेकवेळा पाहतो की क्रिकेटपटूंना शरीराच्या वेगवेगळ्या भागांना दुखापत होत असते. हॅमस्ट्रिंग, फ्रॅक्चर अशा दुखापती अजिबात टाळता येत नाहीत, पण दुखापती होऊनही अनेक खेळाडू आपल्या देशासाठी आणि संघासाठी शौर्य दाखवून मैदानात उतरतात. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही बांगलादेशविरुद्ध असेच काहीसे केले होते. मात्र या यादीत रोहित शर्मा एकटा नसून इतरही अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी दुखापतीनंतरही आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावली.

बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्माच्या अंगठ्याला फिल्डिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला बांगलादेशच्या डावाच्या मध्यातूनच रूग्णालयात दाखल करावे लागले. रोहित फलंदाजीसाठी येणार नाही अशी अपेक्षा होती. कारण तो सलामीला देखील आला नव्हता. मात्र भारतीय संघाला जेव्हा त्याची गरज भासली तेव्हा तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. हिटमॅनने दुखापत असताना देखील 28 चेंडूत 51 धावांची ताबडतोब खेळी केली. मात्र रोहितची ही झुंज अयशस्वी ठरली आणि बांगलादेशने 5 धावांनी सामना जिंकला.

भारताच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याची देखील देशभक्ती अविस्मरणीय आहे. 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिका खेळत असताना कुंबळेला दुखापत झाली होती. त्याने दुखापत झालेल्या जबड्यावर पट्टी बांधून गोलंदाजी केली. तसेच त्याने पहिल्या डावात ब्रायन लाराला बाद केले आणि सलग 14 षटके टाकली. याआधीच्या कसोटी सामन्यात कुंबळेला मर्विन डिलियनचा बाऊन्सर लागला होता, जो त्याच्या जबड्याला लागला होता. रक्तस्त्राव असूनही कुंबळेने प्राथमिक उपचारानंतर 20 मिनिटे फलंदाजी केली. कसोटी सामना अनिर्णीत संपला, पण अनिल कुंबळे तोंडावर पट्टी बांधून गोलंदाजी करतानाचा फोटो आजही भारतीय चाहत्यांच्या मनात ताजा आहे.

2003 मध्ये लाहोर येथे कसोटी सामना खेळताना शोएब अख्तरने टाकलेला चेंडू गैरी कर्स्टनला लागला होता. 53 धावांवर फलंदाजी करत असलेल्या कर्स्टनला तात्काळ मैदानात सोडून बाहेर व्हावे लागले. स्कॅनमध्ये त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 146/4 अशी मजल मारली, कर्स्टन फलंदाजीला आला आणि 46 धावा केल्या. पाकिस्तानने कसोटी सामना जिंकला, पण कर्स्टनच्या या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले.

फलंदाजी करताना रक्ताच्या उलट्या होऊनही युवराज सिंगने 2011 च्या विश्वचषकात भारताला एक सामना जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विश्वचषकाच्या शेवटच्या साखळी सामन्यादरम्यान तो चेन्नईच्या उष्ण आणि दमट हवामानात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत होता. आठव्या षटकात गौतम गंभीर बाद झाला आणि भारताची धावसंख्या 51-2 अशी झाली. आता जबाबदारी युवराज सिंग आणि विराट कोहलीच्या खांद्यावर होती. या दोन्ही खेळाडूंनी भारतासाठी चौथ्या बळीसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी नोंदवली. या खेळीदरम्यान युवराज सिंगला रक्तस्त्राव झाल्याचे पाहून क्रिकेट जगताला धक्का बसला. पण युवराजने हार मानली नाही आणि भारताच्या विजयासाठी मैदानात खेळत राहिला. खरं तर यावेळी युवराज त्याच्या फुफ्फुसात वाढणाऱ्या कॅन्सरच्या गाठीशी लढत होता.

2019 च्या वनडे विश्वचषकादरम्यान धोनीचे बोट फ्रॅक्चर झाले होते. दुखापत असूनही धोनी संपूर्ण विश्वचषक खेळला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्यातून रक्त येत होते. मैदानावर धोनीच्या अंगठ्यातून रक्त येत असल्याचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ. स्मिथने देखील दुखापत असतानाही सामना खेळल्याचे पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2009 मध्ये सिडनी कसोटी सामन्यात मिचेल जॉनसनच्या चेंडूवर स्मिथच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. तेव्हा तो 30 धावांवर खेळत होता, मात्र त्याला निम्म्यातूनच रूग्णालयात दाखल करावे लागले. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 376 धावांचे लक्ष्य दिले होते. ज्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला 100हून अधिक धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत सर्वांना वाटले की सामना संपेल मात्र स्मिथ दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि फलंदाजी केली.

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या ड्रॉसाठी जबाबदार असलेला भारताचा फलंदाज हनुमा विहारी याने देखील दुखापत असताना फलंदाजी केली. सामन्याच्या चौथ्या डावात फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे त्याचा डावा पाय पूर्णपणे सुन्न झाला होता. भारताला विजयासाठी 407 धावांची गरज होती आणि धावसंख्या 250/4 अशी होती. विहारी फलंदाजीला आला आणि त्याने आर अश्विनसोबत नाबाद 62 धावांची भागीदारी करून सामना अनिर्णित केला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे देखील करिअर दुखापतीमुळे चर्चेत राहिले. 2003 च्या विश्वचषकादरम्यान सचिन तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अतिसाराचा त्रास होत असतानाही सामना खेळला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला अतिसाराचा त्रास झाला आणि त्याला तोंड देण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करावा लागला. या सामन्यात सचिनने 97 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हा सामना 183 धावांनी जिंकला.