शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आगामी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असलेल्या काही खेळाडूंचा पत्ता कट झाला आहे. दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडणाऱ्या खेळाडूंकडे पुन्हा दुर्लक्ष झाले आहे. इथं नजर टाकुयात कोण आहेत ते खेळाडू त्यासंदर्भातील सविस्तर
शार्दुल ठाकुरनं इंग्लंड दौऱ्यावरील दोन सामन्यात संधी मिळाली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो चर्चेत आहे. पण घरच्या मैदानात होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यालाही संधी मिळालेली नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर BCCI नं सरफराज खानला टीम इंडियाबाहेरचा रस्ता दाखवला. वेस्ट इंडीज विरुद्धही त्याच्या नावाचा विचार केलेला नाही. दुखापतीमुळे त्याची निवड करण्यात आलेली नाही, असे BCCI नं म्हटलंय.
ईशान किशन हा बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाबाहेर आहे. रिषभ पंत दुखापतग्रस असताना देखील या विकेट किपर बॅटरवर BCCI नं भरवसा ठेवल्याचे दिसत नाही. त्याच्याऐवजी ध्रुव जुरेल हा प्रमुख विकेट किपर तर बॅकअपच्या रुपात एन जगदीशन या दोघांना पसंती देण्यात आलीये.
मोहम्मद शमीही गेल्या अनेक दिवसांपासून कसोटी कमबॅकसाठी वेटिंगवर दिसतोय. २०२३ मध्ये त्याने टीम इंडियाकडून अखेरचा कसोटी सामना खेळा होता.६४ कसोटी सामन्यात त्याने २२९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग संघाकडून द्विशतकी खेळीनंतरही ऋतुराज गायवाडसाठी कसोटी संघाचे दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे सलामीवीराच्या रुपात डाळ शिजेना हे लक्षात आल्यावर ऋतुराज मध्यफळीत फलंदाजी करताना दुलिप करंडक स्पर्धेत द्विशतक झळकावले होते. पण तरीही या मराठमोळ्या चेहऱ्याचा टेस्ट संघातील निवडीसाठी विचार झाल्याचे दिसत नाही. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋतुराजची कसोटीतील पदार्पणाची प्रतिक्षा कायम राहिलीये.
वेस्ट इंडिज दौऱ्याआधी श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्धच्या चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. पहिला सामना खेळल्यावर तो संघाबाहेर झाला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल, असेही बोलले गेले. पण त्यालाही कसोटी संघात कमबॅकची संधी मिळालेली नाही.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीसह विदर्भकर यश राठोडनंही लक्षवेधले होते. दुलीप करंडक स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने १९४ धावांची दमदार खेळी केली होती. पण या युवा खेळाडूला टीम इंडियात एन्ट्री मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
'डिअर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स' म्हणत करुण नायरनं तब्बल आठ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक केले होते. एक संधी मागणाऱ्या या क्रिकेटर इंग्लंड दौऱ्यावर अनेक संधी मिळाल्या. पण तो फ्लॉप ठरला. परिणामी घरच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटी संघातून त्याचा पत्ता कट झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतूनच नव्हे तर बीसीसीआयनं या खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद केल्याचे संकेतच मिळाले आहे. याचा अर्थ त्याचे करिअर संपल्यात जमा आहे.