भारताचा धडाकेबाज फलंदाज करुण नायरचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा कायम आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग शतके ठोकून टीम इंडियात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न वाया गेला. आता तो रणजी ट्रॉफीमध्ये तुफान खेळ करतोय.
करुण नायरने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये आणखी एक शतक झळकावले आहे. रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात विदर्भाकडून खेळताना करुणने तमिळनाडू विरुद्ध १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शानदार शतक झळकावले.
विदर्भ आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामना आज सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळातच करुणने नाबाद शतक ठोकले आणि विदर्भ संघाला ६ बाद २६४ च्या मजबूत स्थितीत आणून ठेवले.
अथर्व तायडे, ध्रुव शौरी आणि आदित्य ठाकरे हे तिघे फ्लॉप झाले. दानिश मालेवारने ७५ धावांची शानदार खेळी केली. पण करुण नायरने या सगळ्यांच्या वरचढ खेळी करत नाबाद १०० धावा करून संघाला वेगळीच उंची गाठून दिली.
रणजी ट्रॉफीमध्ये करुणने विदर्भसाठी सलग दुसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. याआधी करुणने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले होते. त्या सामन्यात त्याने १४ चौकार व षटकारासह १०५ धावा केल्या होत्या.
करुण नायरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ८ डावात ५ शतके आणि एक अर्धशतकासह ७७९ धावा केल्या होत्या. त्यात चार शतके सलग ठोकली होती. पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या टीम इंडियामध्ये त्याला संधी दिली गेली नाही.
आता करुण नायरने रणझी ट्रॉफीमध्ये मोक्याच्या क्वार्टर फायनलमध्ये पुन्हा एकदा एकामागून एक दोन शतके ठोकली आहेत. 'जोवर टीम इंडियात समावेश होत नाही तोवर मी ऐकणारच नाही' असा काहीसा आवेश त्याच्या खेळीतून दिसतो आहे.