ऑस्ट्रेलियन संघाची अष्टपैलू खेळाडू जेस जोनासन तिची मैत्रीण सारा गुडरहमसोबत शुक्रवारी विवाहबंधनात अडकली आहे. खरं तर २०१८ मध्ये यांच्या लग्नाचा साखरपुडा झाला होता.
२०२० मध्ये या दोघी लग्न करणार होत्या, पण कोरोनामुळे विवाहाचा मुहूर्त लांबला. जेस जोनासनने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.
फोटोंमध्ये पाहायला मिळते की, जेस जोनासेन पांढरा शर्ट, राखाडी ब्लेझर आणि ऑफ-व्हाइट पँटमध्ये दिसत आहे. जोनासेनने समलिंगी विवाह करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
फोटो शेअर करताना जोनासनने एक सुंदर कॅप्शन लिहले आहे. तिने म्हटले, 'अखेर आम्ही तिसऱ्या प्रयत्नात लग्न केले. मी माझ्या मैत्रिणीसोबत लग्न केले. 6 एप्रिल हा दिवस माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.'
अलीकडेच पार पडलेल्या महिला प्रीमिअर लीगमध्ये जेस जोनासन दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची भाग होती. तिने पदार्पणाच्या हंगामात ९ सामन्यांत ९ बळी घेतले तर ७९ धावा केल्या होत्या.
या हंगामात दिल्लीच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण जेस जोनासेनचा संघ फायनलमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला.
मुंबई इंडियन्सने फायनलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट राखून पराभव केला. या विजयासह मुंबईच्या संघाने इतिहास रचत महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामाचा किताब उंचावला.
समलिंगी विवाह करणाऱ्या खेळाडूंमध्ये जेस जोनासनसह आणखी काही महिला खेळाडूंचा समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये इंग्लंडची महिला खेळाडू डॅनियल वॅटने तिची प्रेयसी जॉर्जी हॉजसोबत लग्न केले.
एकेकाळी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या प्रेमात वेडी असेलल्या डॅनियल वॅटने पेशाने फुटबॉलपटू असलेल्या जॉर्जी हॉजसोबत लग्न केले.
दोघीही २०१९ पासून म्हणजेच मागील ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होत्या. जेस जोनासन, डॅनियल वॅट यांशिवाय इतरही काही महिला खेळाडूंनी समलिंगी जोडीदाराशी विवाह केला आहे.