"काहींना वाटलं मी पुन्हा येणार नाही पण...", बुमराहचा 'यशस्वी' मंत्र अन् टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

jasprit bumrah on come back : आशिया चषक २०२३ च्या आधीचे जवळपास ११ महिने बुमराहसाठी कठीण होते.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियात आल्यापासून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना एक वेगळीच धास्ती भरते. यॉर्कर किंग म्हणून ख्याती असलेल्या बुम बुम बुमराहने भल्याभल्या फलंदाजांना चीतपट केले. पण, आशिया चषक २०२३ च्या आधीचे जवळपास ११ महिने बुमराहसाठी कठीण होते.

दुखापतीमुळे बुमराह क्रिकेटपासून दूर गेला अन् ट्वेंटी-२० विश्वचषकासह आयपीएलला मुकला. बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियाला जाणवत होती. गोलंदाजीतील कमजोरी भारताला २०२२च्या आशिया चषकापासून आणि त्याच वर्षीच्या ट्वेंटी-२० विश्वचषकापासून दूर घेऊन गेली.

आशिया चषक २०२३ च्या तोंडावर बुमराहचे पुनरागमन झाले अन् भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला. आयर्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी बुमराहच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.

सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला असून जसप्रीत बुमराह आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना घाम फोडत आहे. या पुनरागमनाबद्दल बोलताना त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. काहींना वाटलं मी कधीच पुनरागमन करणार नाही, असे त्याने म्हटले.

बुमराहने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "माझी पत्नी क्रीडा क्षेत्रातच कार्यरत आहे. मी माझ्या कारकिर्दीबद्दल बरीच चर्चा ऐकली असून काहींनी तर मी कधीच परत येणार नाही किंवा पुनरागमन करू शकणार नाही असे म्हटले. पण या सर्व गोष्टींचा मला काहीच फरक पडत नाही. मी आताच्या घडीला खूप आनंदात आहे."

तसेच मी कोणत्याच गोष्टीचा पाठलाग करत नव्हतो. दुखापतीतून पुनरागमन करताना माझ्याकडे खूप वेळ आणि चांगले वातावरण होते. मी सकारात्मक गोष्टींकडे पाहत आहे आणि शक्य तितका त्यांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, असेही बुमराहने सांगितले.

जसप्रीत बुमराहने चालू विश्वचषकात आतापर्यंत सहा सामन्यांत १४ बळी घेतले आहेत. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात घातक गोलंदाजी करताना त्याने ३ बळी घेऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

लखनौ येथे रविवारी झालेल्या सामन्यात भारताने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून विजयाचा षटकार लगावला. भारताने चालू विश्वचषकातील आतापर्यंतचे सर्व सहा सामने जिंकून दबदबा निर्माण केला.

काल झालेल्या लढतीत इंग्लिश गोलंदाजांनी चमक दाखवली पण सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज नतमस्तक झाले. भारताने चालू विश्वचषकात पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली आणि ९ गडी गमावून २२९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघ केवळ १२९ धावांत आटोपला.

मोहम्मद शमी (४) आणि जसप्रीत बुमराह (३) यांनी घातक गोलंदाजी करून भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा जल्लोषाची संधी दिली. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज लिव्हिंगस्टोन होता. २७ धावा करण्यात तो यशस्वी ठरला. इतर फलंदाज फ्लॉप झाले आणि संपूर्ण संघ १२९ धावांवर बाद झाला.