भारतीय महिला क्रिकेट संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून इतिहास रचला. टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने (India Women vs Australia Women) इतिहास रचला.
अनेकदा मोठ्या व्यासपीठावर कांगारूंनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आयसीसी स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान देत विजय साकारला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी अवघ्या ७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत यजमान संघाने ही किमया साधली. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी चाहत्यांचे आभार मानले.
मुंबईकर खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने चाहत्यांसोबत सेल्फी घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. याशिवाय ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिली भारतीय खेळाडूंसाठी फोटोग्राफर बनली अन् तिने खेळभावना दाखवून दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ११ कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये ४ सामने ऑस्ट्रेलियाने तर एक सामना भारताने जिंकला. तर, सहा सामने अनिर्णित राहिले.
लक्षणीय बाब म्हणजे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारी हरमनप्रीत कौर पहिली भारतीय कर्णधार ठरली. या सामन्यातून रिचा घोषने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धचा कसोटी सामना जिंकल्यानंतर आगामी काळात आम्हाला आणखी काही कसोटी सामने खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे, असे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले.
भारताकडून स्नेह राणाने अप्रतिम कामगिरी केली. तिने पहिल्या डावात ५६ धावा देत ३ बळी घेतले, तर दुसऱ्या डावात ६३ धावा देऊन ४ बळी घेतले.
दुसऱ्या डावात टीम इंडियाने सांघिक खेळीच्या जोरावर सर्वबाद ४०६ धावा केल्या. यासह भारताने १८७ धावांची मजबूत आघाडी घेतली.
पाहुणा संघ दुसऱ्या डावात केवळ २६१ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाकडे १८७ धावांची आघाडी होती अन् ऑस्ट्रेलियन संघ केवळ २६१ धावांत आटोपला. त्यामुळे यजमान भारतीय संघाला विजयासाठी केवळ ७४ धावांची आवश्यकता होती. ७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १८.४ षटकांत लक्ष्य गाठून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली.