भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी यजमान संघ जाहीर झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली.
वन डे विश्वचषकासाठी बरोबर एक महिन्याचा कालावधी उरला आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतात तब्बल १२ वर्षांनंतर आयसीसी वन डे विश्वचषकाचे आयोजन होत आहे.
भारताच्या १५ सदस्यीय संघाबद्दल भाष्य करायचे झाले तर, संघात सहा खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच वन डे विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. यामध्ये शुबमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.
याशिवाय अक्षर पटेल देखील पहिल्यांदाच विश्वचषकात सामना खेळू शकतो. २०१५ मध्ये तो विश्वचषकाच्या संघाचा हिस्सा होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
तसेच चार शिलेदार तीन किंवा त्याहून अधिकवेळा विश्वचषक खेळताना दिसतील. यामध्ये विराट कोहली सर्वात अनुभवी आहे.
विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक असणार आहे. विश्वचषक खेळण्याच्या बाबतीत तो टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याने २०११, २०१५ आणि २०१९ चा विश्वचषक खेळला आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटच्या वेळी विश्वचषक जिंकला होता.
याशिवाय रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासाठी हा तिसरा विश्वचषक असेल. या तिन्ही खेळाडूंचा २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभाग होता.
मात्र, विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही. इशान किशन आणि लोकेश राहुल यांना यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले. ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवला देखील विश्वचषकाच्या संघात संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.