Asia Cup 2025 : टीम इंडियातील एकाला १० वर्षांनी तर या पठ्ठ्याला फक्त एका मॅचच्या जोरावर मिळाली पहिली संधी

टीम इंडियातील या ७ खेळाडूंची पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेसाठीच्या संघात निवड झालीये.

आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. याशिवाय वर्षभरानंतर टी-२० संघात कमबॅक करणाऱ्या शुबमन गिलकडे पुन्हा उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये.

आशिया कप स्पर्धेतील १७ व्या हंगामासाठी निवडलेल्या भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्यात आलाय. टीम इंडियात ७ असे खेळाडू आहेत ज्यांची पहिल्यांदाच या मोठ्या स्पर्धेसाठी निवड झालीये.

आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला अभिषेक शर्मा पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व करताना दिसेल. आतापर्यंतच्या टी -२० कारकिर्दीत या युवा सलामीवीरानं १७ टी-२० सामन्यात २ शतके आणि २ अर्धशतकाच्या मदतीने १९३.८५ च्या स्ट्राइक रेटनं ५३५ धावा केल्या असून १३५ ही त्याची छोट्या फॉर्मेटमधील मोठी खेळी आहे.

वरुण चक्रवर्ती हा देखील पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसेल. २०२१ मध्ये टी-२० मध्ये पदार्पणानंतर जवळपास ३ वर्षे संघाबाहेर राहिल्यावर या पठ्ठ्यानं दमदार कमबॅक करून दाखवलंय. आतापर्यंत १८ टी-२० सामन्यात त्याने ३३ विकेट्स घेतल्या आहेत.

शिवम दुबेला अष्टपैलू खेळाडूच्या रुपात आशिया कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान देण्यात आलंय. पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेसाठी निवड झालेल्या ऑलराउंडरनं २०१९ मध्ये भारतीय टी-२० संघाकडून पदार्पणाचा सामान खेळणाऱ्या शिवम दुबेनं आतापर्यंत ३५ टी सामन्यातील २६ डावात ४ अर्धशतकाच्या मदतीने १४०.११ च्या स्ट्राइक रेटनं ५३१ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत २४ डावात त्याने १३ विकेट्स पटकवल्या आहेत.

रिंकू सिंह याने सर्वोत्तम मॅच फिनिशिरच्या रुपात आपली वेगळी छाप सोडलीये. २०२३ मध्ये टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या या बॅटरनं आतापर्यंत ३३ सामन्यातील २४ डावात ३ अर्धशतकाच्या मदतीने १६१.०७ च्या स्ट्राइक रेटसह ५४६ धावा केल्या आहेत.

आशिया कपसाठी विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू सॅमसनला संधी देण्यात आलीये. २०१५ मध्ये भारतीय संघाकडून टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या संजूची पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेसाठी निवड झालीये. आतापर्यंत त्याने ४२ टी२० सामन्यात १५२.३९ च्या स्ट्राइक रेटनं ८६१ धावा केल्या असून यात २ अर्धशतकांसह ३ शतकांचा समावेश आहे.

आशिया कप स्पर्धेसाठीच्या संघात जितेश शर्मा दुसरा विकेट किपर बॅटर आहे. यष्टीमागील जबाबदारीसह मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या जितेश शर्मानं २०२३ मध्ये टी-२० मध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत ९ सामन्यातील ७ डावात १४७.०६ च्या स्ट्राइक रेटनं १०० धावा केल्या आहेत.

हर्षित राणानं २०२५ मध्ये घरच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून टी-२० मध्ये पदार्पण केले. एकमेव सामन्याच्या जोरावर त्याने आशिया कपसाठी टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. कनेक्शन सब्स्टीट्यूटच्या रुपात पदार्पण करताना त्याने ३ विकेट्स घेत सामना फिरवला होता.