India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि 4 ऑगस्टपासून पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. पण, मालिकेला सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला एकामागून एक असे तीन धक्के बसले आहेत.
भारताचा सलामीवीर शुबमन गिल हा दुखापतीमुळे मायदेशात परतला असून कौंटी एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात राखीव गोलंदाज आवेश खान आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली. या दोघांचेही आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणे अवघड आहे.
वॉशिंग्टन आणि आवेश यांच्या बोटाला दुखापत झाली आहे. अशात बीसीसीआयने बॅक अप प्लान तयार करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड दौऱ्याचा कालावधी लक्षात घेता अडीच महिन्यांच्या या दौऱ्यावर टीम इंडियाला दुखापतीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बीसीसीआय आता निवड समितीला नवे खेळाडू पाठवण्याचा विचार करावा, असा सल्ला देऊ शकतात.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोनाचाही फटका बसलेला पाहायला मिळाला. जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलनंतर मिळालेल्या सुट्टीत भारतीय खेळाडूंनी भटकंती केली अन् रिषभ पंतचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण, आता त्यानंही कोरोनावर मात केली आहे.
शुबमनच्या माघारीनंतर संघ व्यवस्थापनानं पर्यायी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ व देवदत्त पडीक्कल यांना इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची विनंती केली होती, परंतु बीसीसीआयनं ती फेटाळून लावली. पण, आता माघारी परतणाऱ्या खेळाडूंची संख्या 3 वर पोहोचल्यानं बीसीसीआय लवकरच बैठक बोलावू शकते.
त्यामुळे पुन्हा एकदा श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पृथ्वी शॉ व देवदत्त पडीक्कल यांची नावं चर्चेत येण्याची शक्यता आहे. या दोघांना कधीपण तसा सांगावा पाठवला जाऊ शकतो.