India vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या कसोटीत जबदरस्त कमबॅक करताना भारताविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. सेंच्युरियनवर भारतानं ११३ धावांनी विजय मिळवला होता, परंतु जोहान्सबर्गवर आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केले.
विराट कोहलीचे या सामन्यात नसणे आफ्रिकेच्या पथ्यावर पडले. आता मालिकेतील तिसरी व अंतिम कसोटी ११ जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळवली जाणार आहे. या निर्णयाक कसोटीसाठी विराटचे पुनरागमन निश्चित होणार असले तरी प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला डच्चू द्यावा हा पेच संघ व्यवस्थापनासमोर आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं ( Rahul Dravid) याबाबतचे मोठे अपडेट्स दिले आहेत.
जोहान्सबर्ग कसोटीचा दुसरा डाव हा अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना त्यांची कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठीची शेवटची संधी होती. त्यानं सर्व अनुभव पणाला लावताना वैयक्तिक अर्धशतक झळकावताना शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला, पर्यायानं स्वतःचेही स्थान कायम ठेवले. राहुल द्रविडनंही संघ व्यवस्थापन पुजारा आणि रहाणे यांच्यावर विश्वास कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत दिले. हनुमा विहारीला पुन्हा एकदा चांगले खेळूनही बाकावर बसावं लागण्याची चिन्ह आहेत. विहारीनं दुसऱ्या डावात महत्त्वाच्या नाबाद ४० धावा केल्या होत्या.
''विहारीनं दोन्ही डावांत अप्रतिम खेळ केला, हे मी सर्वप्रथम मान्य करतो. पहिल्या डावात त्याला दुखापत होऊनही तो खेळपट्टीवर अडून राहिला आणि दुसऱ्या डावातील खेळी तर अप्रतिम होती. त्याच्या खेळीमुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला होता,''असे द्रविड PTIशी बोलताना म्हणाला. श्रेयस अय्यरनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती आणि द्रविडनं त्याचंही कौतुक केलं. तो म्हणाला,''श्रेयस अय्यरनं खरंच चांगली कामगिरी करून दाखवली आणि आशा करतो की त्याला लवकरच संधी मिळेल.''
असे असले तरी रहाणे किंवा पुजारा यांपैकी एकाच्या जागी अय्यरला खेळवले जाईल, असा अर्थ समजू नका. विराट कोहली पुढील सामन्यात पुनरागमन करणार आहे. ''संघात जोपर्यंत सीनियर खेळाडू आहेत, तोपर्यंत या खेळाडूंना वाट पाहावी लागेल. शिवाय करियरच्या सुरुवातीला प्रचंड धावाही कराव्या लागतील. हा खेळाचा नियम आहे आणि त्यांना प्रतीक्षा करावी लागेल,'' असे द्रविडनं स्पष्ट केलं.
मोहम्मद सिराज पूर्णपणे तंदुरूस्त नाही आणि त्याची निवड करताना फिटनेस टेस्ट घ्यावी लागेल. पुढील चार दिवसांत तो तंदुरूस्त होऊ शकतो आणि फिजिओ त्याच्या दुखापतीवर काम करत आहेत. हनुमाच्या दुखापतीबाबत विचाराल, तर माझ्याकडे अपडेट्स नाहीत. मला फिजिओशी चर्चा करावी लागेल, असे द्रविड म्हणाला.
आता साऱ्यांचे लक्ष केपटाऊन कसोटीवर लागले आहे. येथील कसोटी क्रिकेटचा इतिहास भारतासाठी काही खास नाही. १९९३ ते २०१८ या कालावधीत भारतानं येथे ५ कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी तीनमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर दोन सामने ड्रॉ राहिले आहेत. २०१८च्या मालिकेतील पहिलाच सामना इथे खेळला गेला होता आणि त्यात भारताला ७२ धावांनी हार मानावी लागली होती. दक्षिण आफ्रिकेनं येथे खेळलेल्या ५८ पैकी २६ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर २१ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. येथे कसोटी ड्रॉ होण्याचं प्रमाण कमी आहे आणि केवळ ११ सामने ड्रॉ राहिले आहेत.
असा असेल संभाव्य संघ - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत/वृद्धीमान सहा, आर अश्विन/हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव/मोहम्मद सिराज