भारतीय संघ रविवारी ८ मार्चला न्यूझीलंड विरूद्ध टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे.
अंतिम सामन्यापूर्वी भारतीय सलामीवीर संजू सॅमसनची तुफान चर्चा रंगली आहे. आधीच्या दोन सामन्यात संजूने केलेल्या खेळीमुळेच भारताने फायनल गाठली.
'करो वा मरो'च्या लढतीत त्याने विंडीजविरूद्ध तुफानी नाबाद ९७ धावा केल्या. एका बाजूने खिंड लढवत विजयी फटका मारून त्याने भारताला सेमीफायनल गाठून दिली.
सेमीफायनलमध्येही संजू सॅमसनने तडाखेबंद फलंदाजी करत ४२ चेंडूत ८९ धावा कुटल्या. त्यामुळेच भारताने २५३पर्यंत धडक मारली आणि सामना जिंकला.
आता त्याने फायनलमध्येही मोठी खेळी करावी अशी अपेक्षा आहे. त्यातही एक रंजक बाब म्हणजे संजूने २६वी धाव काढताच भारत पुन्हा विश्वविजेता बनू शकतो.
संजू सॅमसनने आतापर्यंत टीम इंडियाकडून ६१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याच्या ५३ डावांमध्ये तीन शतकांसह १,३१० धावा आहेत.
या सामन्यांपैकी १६ सामन्यांमध्ये संजू सॅमसनने २५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढल्या आहेत आणि त्या सर्व १६ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.
त्यामुळे आकडेवारी पाहिल्यास हे स्पष्ट आहे की संजू सॅमसनने टी२० सामन्यात २६ धावांचा टप्पा गाठला की भारताच्या विजयाची शक्यता थेट १०० टक्के आहे.
त्यामुळेच अंतिम सामन्यात संजू सॅमसनकडून २६ किंवा त्याहून अधिक धावा काढण्याची अपेक्षा केली जाईल आणि टीम इंडियाचा विजय निश्चित होईल.