गुवाहाटीच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १५४ धावांचे टार्गेट फक्त ६० चेंडूत पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
याआधी १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू शिल्लक राखून विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम हा दोन वेळचा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन कॅरेबियन संघाच्या नावे होता.
२०२४ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३७ चेंडू राखून विजय नोंदवला होता.
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ८ विकेट्स आणि ६० चेंडू राखून १५४ धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवत नवा इतिहास रचला.
न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर विकेट गमावल्यावर भारतीय संघाने अवघ्या १९ चेंडूत धावफलकावर अर्धशतक लावले.
ही टीम इंडियाची टी-२० मधील सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. ईशान किशन आणि अभिषेक शर्माच्या धमाकेदार खेळीमुळे हा खास विक्रम टीम इंडियाने नोंदवला.
या सामन्यात भारतानं टी-२० मधील पॉवरप्ले दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारली. पॉवरप्लेमध्ये २ विकेट्सच्या मोबदल्यात ९४ धावा ठोकल्या. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली पॉवरप्लेमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
गतवर्षी म्हणजे २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वानखेडेच्या मैदानातील सामन्यात टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात ९५ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
अभिषेक शर्मानं या सामन्यात भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. एवढेच नाही तर २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक ९ वेळा अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम करुन दाखवत त्याने सूर्यकुमार यादवची बरोबरी केली.
२०२२ ते २०२६ या कालावधीत भारतीय संघाने घरच्या मैदानात सलग दहाव्या मालिका विजयाचा खास विक्रमही नोंदवला आहे. ICC च्या नियमित सदस्य असलेल्या संघाविरुद्ध टीम इंडियाचा हा सलग ११ वा मालिका विजय ठरला. एका मालिका विजयासह टीम इंडिया पाकिस्तानला मागे टाकेल. पाकिस्तानच्या संघाने २०१६ ते २०१८ या कालावधीत सलग टी-२० मध्ये सलग ११ मालिका जिंकल्याचा विक्रम आहे.