अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या नेदरलँड्स विरुद्धच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यातही त्याने कमालीची कामगिरी केली. या सामन्यात छोट्याखानी खेळीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्या बॅटिंग बॉलिंगमध्ये धमाकेदार कामगिरीसह टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
हार्दिक पांड्याने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबेसोबत ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचताना २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली.
या सामन्यात २२ धावा करताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार केला. हार्दिक पांड्याने टी-२० मध्ये २०० पेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.
टी-२० मध्ये ६००० धावा आणि २०० पेक्षा अधिक विकेट्स अशी कामगिरी नोंदवणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे.
जगातील सर्वात मोठ्या अशा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दुहेरी विक्रमी डाव साधल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघाने खास पोस्ट शेअर करत आपल्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या आहेत.
२०१३ मध्ये हार्दिक पांड्याने बडोदाच्या संघाकडून टी-२० क्रिकेटच्या आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना तो लक्षवेधी ठरला अन् अल्पावधीतच त्याने टीम इंडियात एन्ट्री मारली.
हार्दिक पांड्याने जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले होते. मधल्या काळात दुखापतीमुळे त्याच्या करिअरवरच प्रश्न निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले.
पण हार्दिक पांड्याने दुखापतीतून सावरून दमदार कमबॅक करत टीम इंडियासाठी हुकमी एक्का ठरण्याची आपली ताकद दाखवून दिली आहे.
आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही हार्दिक पांड्या सर्वात आघाडीवर आहे. यंदाच्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नेदरलँड्सविरुद्धच्या साखळी फेरीतील लढतीपर्यंत त्याने १८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. या यादीत मिचेल स्टार्क ११ विकेट्स सह दुसऱ्या स्थानावर आहे.