Virat Kohli Test Century: सलग तिसऱ्या वर्षी किंग कोहलीची शतकासाठी 'कसोटी', 10 डावात अर्धशतकाचांही 'दुष्काळ'

Virat Kohli Test Analysis: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलेल्या आता ३ वर्षांचा काळ लोटला आहे.

विराट कोहली बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 2 सामन्यातील 4 डावांमध्ये एकूण 45 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 24 एवढी राहिली.

चटगाव येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने पहिल्या डावात एक धाव तर दुसऱ्या डावात नाबाद 19 धावा केल्या. आज झालेला कसोटी सामना हा भारतीय संघाचा यंदाचा शेवटचा सामना होता.

विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावून 1127 दिवस झाले आहेत. त्याने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते.

तेव्हा किंग कोहलीने कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर डे नाईट कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्या कसोटी सामन्यात विराटने 136 धावा केल्या होत्या.

विराटने या वर्षी 2022 मध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 11 डावात 265 धावा केल्या. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या 79 अशी राहिली. यावर्षी कसोटीत कोहलीची फलंदाजीची सरासरी 26.50 होती. वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केपटाऊन कसोटी सामन्यात कोहलीने एकमेव अर्धशतक झळकावले होते.

लक्षणीय बाब म्हणजे किंग कोहलीच्या कसोटीतील शतकांचा दुष्काळ अद्याप सुरूच आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत देखील विराटला काही खास कामगिरी करता आली नाही.

केपटाऊन कसोटीनंतर विराट कोहलीला शेवटच्या 10 डावांमध्ये 50 धावांचा आकडाही गाठता आला नाही. 34 वर्षीय कोहलीने मागील 10 कसोटी डावांमध्ये 01, 24, 19*, 01, 20, 11, 13, 23, 45 आणि 29 धावा केल्या आहेत. 2020, 2021 आणि 2022 या वर्षात विराटला कसोटीतील शतकांसाठी तरसावे लागले.

विराट कोहलीने 2020 मध्ये 3 कसोटी सामने खेळले त्यामध्ये 116 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक अर्धशतक झळकावले, तर 2021 मध्ये विराटने 11 कसोटी सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या जोरावर 536 धावा केल्या.

विराट कोहलीने यंदा झालेल्या आशिया चषकात अफगाणिस्तानविरूद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने बांगलादेशविरूद्धच्या वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात देखील शतक झळकावले. मात्र, किंग कोहलीला कसोटीत शतक झळकावण्यात अपयश आले.