Ind vs Aus test : रॉकस्टार 'सर' जडेजा: ऑस्ट्रेलियाला 10 वर्षांपासून सापडला नाही तोड; कांगारुला सळो की पळो...

Ind vs Aus test : ऑस्ट्रेलियाने गेल्या 10 वर्षात भारतात 3 मालिका खेळल्या आणि तिन्ही मालिकांमध्ये जडेजाने कांगारुला अडचणीत आणले.

Ind vs Aus test : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जखमी झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यावेळी जडेजा त्याच्या कारकिर्दीत सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. पण दुखापतीने त्याला क्रिकेटपासून दूर ठेवले आणि तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रवींद्र जडेजा मैदानात परतला. दुखापतीतून आलेल्या जडेजाने ऑस्ट्रेलियाला सळो की पळो करुन सोडलं आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली तेव्हा रवींद्र जडेजाचे नाव संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु त्याच्या नावापुढे फिटनेस सिद्ध करण्याचे आवाहन होते. जडेजा फिट होणार नाही, अशी भीती अनेकांना होती. पण मालिकेच्या अगदी आधीच त्याने रणजी ट्रॉफी सामना खेळला आणि तिथे चांगली कामगिरी करुन स्वतःला फिट घोषित केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये रवींद्र जडेजाने पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये धुमाकूळ घातला. आधी नागपूर आणि आता दिल्ली कसोटीत कांगारू संघ रवींद्र जडेजाच्या फिरकीपुढे पूर्णपणे गारद झाला. रवींद्र जडेजाची अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट वळणाने ऑस्ट्रेलियाला त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले.

विशेष म्हणजे, 'सर' रवींद्र जडेजासमोर ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑस्ट्रेलियाने गेल्या 10 वर्षात भारतात 3 मालिका खेळल्या असून रवींद्र जडेजाने या तिन्ही मालिकांमध्ये कांगारू संघाला अडचणीत आणले आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांपासून कांगारू संघाला रवींद्र जडेजाचा तोड मिळू शकलेला नाही.

रवींद्र जडेजाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी रेकॉर्ड पाहिला तर त्याने 14 सामन्यांच्या 26 डावांत 80 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान रवींद्र जडेजाची गोलंदाजीची सरासरी 17.23 होती. त्याने कांगारू संघाविरुद्ध 5 डावात 5 बळी, एका सामन्यात 10 बळी घेतले आहेत. जडेजाच्या विक्रमी मालिकेवर नजर टाकली तर, त्याने भारतात झालेल्या गेल्या 3 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि कांगारुंना एकही संधी दिली नाही.

रवींद्र जडेजाची गोलंदाजी कामगिरी, बॉर्डर-गावस्कर करंडक (भारतात)- वर्ष 2012-13: 4 सामने, 24 विकेट, 17.45 सरासरी. वर्ष 2016-17: 4 सामने, 25 विकेट, 18.56 सरासरी. वर्ष 2022-23: 2 सामने, 17 विकेट, 11.23 सरासरी (मालिका सुरू आहे). रवींद्र जडेजाची गोलंदाजी कामगिरी, बॉर्डर-गावस्कर करंडक (ऑस्ट्रेलियामध्ये)- वर्ष 2018-19: 2 सामने, 7 विकेट, 28.57 सरासरी. वर्ष 2020-21: 2 सामने, 7 विकेट, 15.00 सरासरी.

गेल्या काही वर्षांतील रवींद्र जडेजाच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याने कसोटी अष्टपैलू म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कसोटी क्रमवारीत तो सध्या नंबर-1 अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याची कामगिरीही याची साक्ष देते. रवींद्र जडेजा याआधीही गोलंदाज म्हणून आश्चर्यकारक कामगिरी करत आहे, परंतु 2018 नंतर त्याच्या फलंदाजीत खूप सुधारणा झाली आहे.

अलीकडेच तो कसोटी क्रिकेटमध्ये 2500 धावा आणि 250 विकेट्सच्या क्लबमध्येही सामील झाला आहे. रवींद्र जडेजाच्या नावावर 62 कसोटीत 2619 धावा आहेत, ज्यात त्याची सरासरी 36.88 आहे. रवींद्र जडेजाने कसोटीत 3 शतके झळकावली आहेत. तर, गोलंदाजीत त्याने 62 कसोटीत 259 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 23.82 आहे.