Ind vs Pak Asia Cup 2023, Rain: भारतीय संघाने आशिया कपच्या सुपर-4 फेरीत प्रवेश मिळवला. नेपाळ विरूद्धच्या सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाने पुढील फेरीतील प्रवेश निश्चित केला. आता भारताचा सुपर-4 मधील पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.
भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकची सुपर-4 फेरी खेळणार आहे. या सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. साखळी सामन्यात पावसामुळे दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला होता.
भारत-पाक यांच्यातील साखळी सामन्यात पावसामुळे चाहत्यांचा आणि खेळाडूंचा हिरमोड झाला. सुपर-4 च्या सामन्यात मात्र चाहत्यांचा असा हिरमोड होणार नाही. कारण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास, काय होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे.
भारताने साखळी फेरीत पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांशी सामने खेळले. दोनही सामन्यात पावसाने चाहत्यांना निराश केले. ही निराशा टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे.
ACC ने कोलंबोमध्ये सततच्या पावसामुळे सुपर-4 सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबरपासूनचे सामने कोलंबो ऐवजी हंबनटोटा येथे होणार आहेत. तसेच अंतिम सामनाही हंबनटोटा येथे खेळवला जाणार आहे.
याशिवाय इनसाइडस्पोर्टच्या रिपोर्टनुसार, भारत-पाक सुपर-4 फेरीच्या सामन्यात पाऊस खलनायक ठरल्यास राखीव दिवसही आहे. त्यामुळे सामना 10 सप्टेंबरला पूर्ण न झाल्यास 11 सप्टेंबरला खेळवून पूर्ण करण्यात येईल.