ICC च्या १३ व्या हंगामातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासह वेगवेगळ्या ताफ्यात २५ वर्षांच्या आतील असे काही चेहरे आहेत जे अल्पावधिक आपल्या संघाचा कणा बनले आहेत. इथं एक नजर टाकुयात अशा ७ महिला खेळाडूंर ज्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.
भारतीय संघातील सलामीची बॅटर प्रतिका रावल या यादीत सर्वात आघाडीवर आहे. २४ वर्षीय बॅटरनं आतापर्यंत वनडेतील अवघ्या १७ डावात ८०२ धावा केल्या आहेत. स्मृती मानधनासोबत ती सातत्याने हिट शो देताना दिसलीये. यंदाच्या हंगामात भारतीय ताफ्यातील ती मोठा आधारस्तंभ आहे. यंदाच्या हंगामात अनेक विक्रम तिच्या निशाण्यावर असतील.
ऑस्ट्रेलियाची २२ वर्षीय जॉर्जिया वोल ही मॉडर्न जमान्यातील तगडी ओपनर बॅटर मानली जाते. पार्ट टाइम गोलंदाजीत छाप सोडूनही ती संघासाठी उपयुक्त कामगिरी करण्यात माहिर आहे.
भारताच्या ताफ्यातील २२ वर्षीय युवा गोलंदाज क्रांती गोड हिने आपल्या स्विंगनं प्रभावित केलं आहे. ७ वनडे सामन्यात १४ विकेट्स आपल्या खात्यात जमा करणारी क्रांती यंदाच्या हंगामात टीम इंडियासाठी हुकमी एक्का ठरू शकते.
२०१८ पासून श्रीलंकन संघाचा भाग असलेली कविशा दिलहारी ही देखील या स्पर्धेतील लक्षवेधी चेहऱ्यांपैकी एक आहे. २४ वर्षीय स्पिन ऑलराउंडर फलंदाजीत धमक दाखवून सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारी खेळाडू आहे.
ॲनेरी डेर्कसेन ही दक्षिण आफ्रिकेच्या संघातील उदयोन्मुख ऑल-राउंडर आहे. क्लीन हिटर आणि पार्टनरशिप तोडणारी बॉलर अशी तिची ओळख आहे.
जॉर्जिया प्लिमर ही न्यूझीलंडच्या ताफ्यातील टॉप ऑर्डर बॅटरपैकी एक आहे. २१ वर्षीय खेळाडू उजव्या हाताने फलंदाजीसह मध्यमगती गोलंदाजीसह आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यात सक्षम आहे.
इंग्लंडच्या संघाला २४ वर्षीय लॉरेन लुईस फाइलरच्या रुपात नवी स्पीडस्टार मिळालीये. ७९ mph ते ८० kph वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता असणारी ही युवा गोलंदाज यंदाच्या हंगामात कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.