मॅच न खेळता तिलक वर्मा फायद्यात! बटलरच्या फटकेबाजीमुळं सूर्या दादा घाट्यात

जोस बटलरच्या जबरदस्त कामगिरीचा सूर्यकुमार यादवला बसला फटका

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नव्या टी-२० क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपासून दूर असूनही फायदा झाला आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवला मात्र फटका बसल्याचे दिसते.

आयसीसीच्या नव्या टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड याने अव्वलस्थान कायम ठेवले आहे. ८५६ रेटिंग पॉइंट्ससह तो अव्वलस्थानावर आहे.

हेडच्या पाठोपाठ अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात ८२९ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत.

तिलक वर्मा एका स्थानांनी झेप घेत आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट्स ८०४ वर स्थिर आहेत. पण फिल सॉल्टची घसरण झाल्यामुळे तिलक वर्मा आता तिसऱ्या स्थानावर विराजमान झालाय.

फिल सॉल्टनं वेस्ट इंडिज दौऱ्यावरील टी-२० मालिकेतून माघार घेतल्यामुळे त्याला क्रमवारीत फटका बसला आहे. तो आता ७९१ रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे.

जोस बटलरनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर आयीसीसी टी-२० क्रमवारीत ७७२ रेटिंग पॉइंट्स आपल्या खात्यात जमा करत सूर्यकुमार यादवला मागे टाकत पाचव्या स्थानावर झेप घेतलीये.

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आयसीसी टी-२० क्रमवारीत ७३९ रेटिंग पॉइंट्ससह सहाव्या स्थानावर आहे.

IPL च्या १८ व्या हंगामात सूर्यकुमार यादवनं १६ सामन्यात ७१७ धावा केल्या होत्या. प्रत्येक सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा करत त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. हा रुबाब आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कायम ठेवत तो रँकिंगमध्ये मुसंडी मारणार का? ते पाहण्याजोगे असेल.