आयसीसीने खेळाडूंची ताजी आयसीसी क्रमवारी जाहीर केली आहे. वन डे मधील फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने दोन पाऊले पुढे जात आठव्या स्थानी मजल मारली आहे. तर युवा खेळाडू ईशान किशनने या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
विराट कोहलीने अलीकडेच बांगलादेशविरूद्धच्या अखेरच्या अर्थात तिसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले होते. हे त्याच्या कारकिर्दीतील 72वे शतक ठरले आहे. याच सामन्यात युवा खेळाडू ईशान किशनने ऐतिहासिक 210 धावांची खेळी केली होती. विराट कोहली वन डे क्रमवारीत 707 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
ईशानला त्याच्या दुहेरी शतकामुळे आयसीसी क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे. खरं तर या आधी तो 117व्या स्थानी होता मात्र आता त्याने 37व्या स्थानी झेप घेतली आहे. ईशानने 126 चेंडूत 200 धावांची खेळी करून इतिहास रचला आहे. तो द्विशतक ठोकणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
जवळपास तीन वर्षांहून अधिक कालावधीनंतर किंग कोहलीने वन डे मध्ये शतक झळकावले. विराटने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत 91 चेंडूत 113 धावा केल्या. ऑगस्ट 2019 नंतर 50 षटकांच्या फॉरमॅटमधील हे त्याचे पहिले शतक होते. मात्र किशनच्या ई'शानदार' खेळीमुळे त्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
ईशान किशनने 131 चेंडूत 210 धावांची खेळी करून नवा विक्रम रचला. ढाका येथील मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने 82 धावांच्या खेळीच्या जोरावर फलंदाजीच्या यादीत 20 व्या स्थानावरून 15 व्या स्थानावर जाण्यात यश मिळवले.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने अलीकडेच झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत 3 शतके झळकावली होते. तो 937 गुणांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
लाबुशेनच्या पाठोपाठ 875 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कांगारूच्या संघाचा स्टीव्ह स्मिथ आहे. तर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम 871 गुणांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. लक्षणीय बाब म्हणजे रिषभ पंत पाचव्या तर रोहित शर्मा कसोटी क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा आहे. या यादीत पॅट कमिन्स 878 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. टॉप-10 मध्ये एकूण 4 ऑस्ट्रेलियाच्या संघाचे गोलंदाज आहेत. तर 842 गुणांसह भारताचा आर अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानी आहे.