आशिया चषक 2022 भारतीय संघाने विजयाने आपल्या अभियानाची सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून भारताने ही किमया साधली. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी करून विजय खेचून आणला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयाला भारतीय गोलंदाजांनी खरे ठरवले. मोठ्या कालावधीनंतर मोठ्या व्यासपीठावर खेळत असलेल्या भुवनेश्वर कुमारने त्याच्या दुसऱ्याच षटकात पाकिस्तानला मोठा झटका दिला.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने चार षटकात 26 धावा देऊन सर्वाधिक 4 बळी पटकावले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आतापर्यंतच्या सर्व टी-20 सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची शिकार करून भुवीने सामन्याच्या तिसऱ्याच षटकात पाकिस्तानला मोठा झटका दिला.
भारताकडून गोलंदाजीची प्रमुख धुरा भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर होती. पॉवरप्लेमधील आपल्या 2 षटकांमध्ये त्याने 1 बळी पटकावून प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. सामन्याच्या अखेरपर्यंत बाबर आझम, आसिफ अली, शादाब खान आणि नसीम शाह या चौघांना तंबूत पाठवून भुवीने जोरदार कमबॅक केला.
भुवनेश्वर कुमारसाठी मागील एक-दोन वर्षांचा कालावधी चढ-उताराचा राहिला. कारण या काळात त्याला दुखापतीचा सामना करावा लागला आणि त्यानंतर त्याला संघातून देखील वगळण्यात आले. क्रिकेटशिवाय त्याच्या वैयक्तिक जीवनात देखील त्याला संघर्ष करावा लागला. याचदरम्यान त्याच्या वडीलांचे निधन झाले होते. एवढ्या कठीण परिस्थितीतूनही भुवनेश्वर कुमारने उभारी घेऊन शानदार पुनरागमन केले.
आयपीएल 2020 दरम्यान भुवीला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण हंगाम क्रिकेटपासून दूर राहिला होता. क्रिकेटपासून जास्त काळ लांब राहिल्याने त्याला खराब फॉर्मचा सामना करावा लागला. एकूणच तो भारतीय संघातून देखील बाहेर फेकला गेला.
आयपीएल 2021 दरम्यान भुवनेश्वर कुमारचे वडील किरण पाल सिंग यांचे निधन झाले होते. ते यकृताच्या कॅन्सरशी झुंज देत होते आणि नोएडामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वडीलांच्या उपचारासाठी त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती.
आयपीएल 2022 मध्ये त्याने एकूण 12 बळी घेतले होते. मार्च 2021 पासून भुवनेश्वर कुमारने 29 टी-20 डावांमध्ये एकूण 36 बळी घेतले आहेत आणि याकाळात त्याची सरासरी देखील चांगली राहिली. साहजिकच भुवनेश्वर कुमार टी-20 मध्ये ज्याप्रकारे कामगिरी करत आहे त्यावरून टी-20 विश्वचषकाच्या संघात त्याला जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र आगामी काळातील त्याच्या प्रदर्शनावरूनच टी-20 विश्वचषकातील संघाबाबत चित्र स्पष्ट होईल.