विराट कोहली BCCIच्या पगारापेक्षा जास्त एका Insta पोस्टमधून कमावतो; रोनोल्डो, मेस्सीला टक्कर

Top 3 athletes earnings per post on Instagram in 2023- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) हा इंस्टाग्रामवर एका पोस्टमागे सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

BCCIच्या वार्षिक करारातून विराट कोहलीला वर्षाला ७ कोटी पगार मिळतो, परंतु त्यापेक्षा जास्त विराट इंस्टावरील एका पोस्टमधून कमावत असल्याची माहिती समोर आली आहे.

महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo ) या यादीत सर्वांवर भारी पडला आहे आणि सलग तिसऱ्या वर्षी त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे. जागतिक सुपरस्टार आणि फुटबॉल आयकॉन रोनाल्डोने सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामचा सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी म्हणून नाव पटकावले आहे.

इंस्टाग्राम शेड्युलिंग टूल हॉपर एचक्यू द्वारे संकलित केलेल्या यादीनुसार पोर्तुगालचा सुपरस्टार आणि पाच वेळा बॅलोन डी'ओर विजेता रोनाल्डो प्रति पोस्ट $३.२३४ दशलक्ष (अंदाजे रु. २६.७६ कोटी) इतकी चकित करणारी रक्कम कमावतो. रोनाल्डोचा दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी इंस्टाग्रामवरून प्रति पोस्ट $२.५९७ दशलक्ष (अंदाजे २१.४९ कोटी) कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे.

रोनाल्डो हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेला व्यक्ती आहे. ३८ वर्षीय रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक ६०० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल २० सेलिब्रेटींमध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे.

भारताचा सुपरस्टार विराट कोहली हा ब्राझीलचा नेयमार आणि फ्रानसचा कायलिन एमबाप्पे या फुटबॉल मास्टर्सच्या पुढे आहे. कोहली या यादीत १४व्या स्थानावर आहे. माजी भारतीय कर्णधार इंस्टाग्रामवर प्रति पोस्ट सुमारे $१.३८४ दशलक्ष (अंदाजे ११.४५ कोटी रुपये) कमवतो.

$१.१४१ दशलक्ष ( अंदाजे रु. ९.४४ कोटी) कमावणारा नेयमार या यादीत १९व्या स्थानावर आहे, तर पॅरिस सेंट जर्मेनमधील त्याचा क्लब सहकारी Kylian Mbappe $५७५००० (अंदाजे रु. ४.७५ कोटी) कमावतो आणि तो २७व्या स्थानावर आहे. बास्केटबॉल आयकॉन लेब्रॉन जेम्सला ७.०४ कोटी मिळतात आणइ तो यादीत २४ व्या क्रमांकावर आहे.

इंस्टाग्रावर प्रतीपोस्ट सर्वाधिक कमाई करणारे सेलिब्रेटी - ख्रिस्तियानो रोनाल्डो ( $3,234,000), लिओनेल मेस्सी ( $2,597,000), सेलेना गोमेझ ( $2,558,000), कायलिन जेनर ( $2,386,000), ड्वेन जॉन्सन ( $2,326,000), एरियाना ग्रँडे ( $2,264,000), किम कॅर्दशीएन ( $2,176,000), बेयॉन्से नोव्लेस ( $1,889,000), ख्लोए कॅर्दशीएन ( $1,866,000) आणि जस्टीन बिबर ( $1,763,000).