भारतीय संघ हा आशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. आतापर्यंतच्या १६ हंगामात टीम इंडियाने ८ वेळा ही स्पर्धा जिंकलीये.
अझरुद्दीनसह तीन कर्णधार असे आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन वेळा बाजी मारलीये. इथं एक नजर टाकुयात आशिया कप स्पर्धेतील कॅप्टन्सीच्या खास रेकॉर्डवर
१९८४ मध्ये आशिया कप स्पर्धेतील पहिल्या हंगामात भारतीय संघाने जेतेपद मिळवले होते. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही स्पर्धा गाजवली होती.
मोहम्मद अझरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९९१ आणि १९९५ मध्ये वनडे आशिया कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००० मध्ये बांगलादेशच्या ढाका येथे झालेल्या फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करून आशिया चषकावर नाव कोरले होते.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१० मध्ये वनडे फॉरमॅटमधील आशिया कप स्पर्धा जिंकली.
२०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टी २० प्रकारातील आशिया कप स्पर्धेतही भारतीय संघाने बाजी मारली होती. वनडे आणि टी-२० दोन्ही प्रकारात संघाला विजय मिळवून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.
रोहित शर्मानं २०१८ आणि २०२३ मध्ये दोन वेळा भारतीय संघाला आशिया कप स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले.
२०२२ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने टी-२० फॉरमॅटमधील आशिया कप स्पर्धा खेळली. यावेळी रोहित शर्माला धोनीची बरोबरी करण्याची संधी होती. पण भारतीय संघ साखळी फेरीतूनच स्पर्धेत आउट झाला होता.