रविवारी रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर पाच गडी राखून मात केली. याबरोबरच भारतीय संघाने नवव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. मात्र विजेतेपद मिळाल्यानंतरही आशिया चषकाची ट्रॉफी भारतीय संघाला अद्याप मिळालेली नाही. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर नक्वी यांनी ही ट्रॉफी आपल्यासोबत नेली आहे. त्यामुळे आता आशिया चषकाची ट्रॉफी भारतीय संघाला मिळणार की नाही? याबाबच आता चर्चांना उधाण आलं आहे.
भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर मोहसिन नक्वी यांच्या हस्ते विजेतेपदाची ट्रॉफी घेण्यास नकार दिल्याने बराच वेळी मैदानान नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. त्याचदरम्यान आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले नक्वी विजेतेपदाची ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन निघून गेले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी न घेताच विजेतेपदाचा जल्लोश साजरा केला. तसेच हातात ट्रॉफी घेतल्याचा अभिनय करत फोटो काढले. अशा परिस्थितीत आता ट्रॉफीबाबत आयसीसीचा नियम काह आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विजेतेपद मिळवल्यानंतर कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणं हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या अंतर्गत येऊ शकतं. मात्र त्याबाबत कुठलाही स्पष्ट नियम बनवण्यात आलेला नाही. अशी कृती ही क्रिकेटमधील खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मानले जाऊ शकते. आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला त्याने चषक का स्वीकारला नाही याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. त्यानंतर आशियाई क्रिकेट संघटना आणि आयसीसी त्याबाबत पुढील निर्णय घेऊ शकतात.
कुठलाही सामना किंवा विजेतेपद पटकावल्यानंतर चषक न स्वीकारणं हा क्रिकेटमधील खेळभावनेचा अपमान समजला जाऊ शकतो. तसेच त्यापासून संरक्षण करणं हा आयसीसीच्या आचारसंहितेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव याला त्याने केलेल्या कृतीबाबत स्पष्टीकरण द्यावं लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विजेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय संघाला ट्रॉफी न दिली गेल्याने आता बीसीसीआय याबाबत आयसीसीच्या पुढच्या बैठकीत अधिकृतरीत्या तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आयसीसीकडे शिस्तपालनाबाबतची प्रक्रिया निश्चित केलेली आहे. आयसीसी या परिस्थितीचं परीक्षण आचारसंहितेच्या माध्यमातून करू शकते. तसेच कुठल्या नियमाचं उल्लंघन झालं आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. जर उल्लंघन झालं असेल तर यामध्ये कोणाची चूक आहे आणि त्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे, याचा निर्णय घेतला जाईल.