All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म जबरदस्त राहिला. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांच्या येण्याने गोलंदाजी विभागात सुधारणा दिसेल असे वाटले होते, परंतु तसे नाही झाले. भुवनेश्वर कुमारवर फॉर्म रुसलेला दिसतोय, त्यात राखीव गोलंदाज म्हणून निवड झालेल्या मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झालीय. पण, आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार भारतीय संघात बदल होऊ शकतो.
एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. ही टूर्नामेंट राऊंड १, सुपर-१२ आणि प्ले-ऑफ अशा तीन टप्प्यांत खेळवली जाणार आहे. आतापर्यंत ८ संघ सुपर-१२ साठी थेट पात्र ठरले आहेत, तर उर्वरित ४ संघ पात्रता फेरी जिंकून आपले स्थान निश्चित करतील.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या Super 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल.
वर्ल्ड कपसाठी पॉइंट्स टेबल सिस्टीम जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला विजयासाठी दोन गुण मिळतील आणि सामना बरोबरीत किंवा रद्द झाल्यास संघांमध्ये एक गुण विभागला जाईल. गटातील दोन संघांचे गुण समान असल्यास, त्यांचा नेट रन-रेट पाहून आणि त्यांचा आमने-सामने रेकॉर्ड पाहून निर्णय घेतला जाईल.
भारत- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग; राखीव - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
रिषभ पंत व दिनेश कार्तिक हे दोन यष्टिरक्षक-फलंदाज ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात आहेतच, परंतु कर्णधार रोहित शर्माचा कल हा कार्तिकच्या बाजूने अधिक दिसतोय. अशात दीपक हुडाच्याही दुखापतीनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त न झाल्यास राखीव खेळाडूंत असलेला श्रेयस अय्यर मुख्य संघात येऊ शकतो किंवा संजू सॅमसनला बोलावणे धाडले जाऊ शकते. आता तर ICC नेच नवा नियम जाहीर केला आहे आणि त्यानुसार हे शक्य आहे.
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. आतापर्यंत १६ पैकी १६ संघांनी आपापल्या संघाची घोषणा केली आहे. भारताच्या ग्रुप ब मधील चारही संघांनी तगडे खेळाडू मैदानावर उतरवले आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर कडवे आव्हान असणार आहे. आयसीसीच्या नव्या नियमानुसार १६ संघ ९ ऑक्टोबरपर्यंत आपापल्या संघात बदल करू शकणार आहेत. मग खेळाडू दुखापतग्रस्त असो किंवा नसो... मात्र, अंतिम तारखेनंतर संघाला बदल करायचा असल्यास ICCची परवानगी घ्यावी लागणार आहे.