टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने २०२०-२१ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) च्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
त्यानंतर त्याची कामगिरी खूपच खालावली. २०१७ ते २०२३ दरम्यान रहाणेने एका कॅलेंडर वर्षात फक्त एकदाच ४० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. त्यामुळे त्याची संघातून गच्छंती झाली.
दीर्घकाळ खराब कामगिरी केल्यानंतर, भारतीय निवडकर्त्यांनी त्याला संघाबाहेर केले. पण आता मात्र तो पुन्हा एकदा कसोटी संघात परतण्याबाबत आशा बाळगत आहे. याचदरम्यान, त्याने मुख्य निवडकर्ता अजिक आगरकरला स्पष्ट संदेश दिला आहे.
अजिंक्य रहाणे म्हणाला, 'वय हा केवळ एक आकडा असतो. संघ निवडताना हेतुबद्दल बोलायला हवे. कसोटी खेळण्यासाठी असलेले पॅशन आणि केलेली मेहनत याला जास्त महत्त्व असायला हवे.'
'माईक हसीने ऑस्ट्रेलियाकडून ३०व्या वर्षी डेब्यू केला आणि भरपूर धावा केल्या. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की, ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या BGT मालिकेसाठी टीम इंडियाला माझी गरज होती.'
'सिलेक्टर्स कायम देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलत असतात. मी गेल्या ४-५ हंगामापासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळतोय. काही वेळा फक्त धावा किंवा कामगिरी नव्हे; तर अनुभवालाही महत्त्व द्यायला हवे.'
'इतके वर्ष क्रिकेट खेळल्यावर माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूला पुनरागमनासाठी जास्त संधी मिळायला हवी. पण सिलेक्टर्स काहीच संवाद साधत नाहीत. अशा वेळी माझ्या हातात काहीच नसते.'
'रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारताला सामना जिंकवून दिला. त्यांनी दाखवून दिले की वय हा केवळ एक आकडा असतो. जेव्हा तुम्ही मोठया संघाविरूद्ध खेळता, तेव्हा अनुभवही महत्त्वाचा असतो.'