IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात झाल्या तब्बल 458 धावा, 4 गोलंदाजांनीही ठोकले 'अर्धशतक'

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीचे दोन्हीही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून इतिहास रचला आहे. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात रोहित सेनेने 16 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शानदार फलंदाजीचा मारा पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने 200 पार धावसंख्या नेली. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने अवघ्या 42 चेंडूत शतक झळकावून एकतर्फी झुंज दिली.

खरं तर डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक यांना आणखी एका फलंदाजाची साथ मिळाली असती तर सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागला असता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला सलामीच्या दोन्ही सामन्यात खाते देखील उघडता आले नाही. कालच्या सामन्यात बवुमाने पहिले षटक मेडन घालवले आणि तो बाद झाला.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शानदार सुरूवात केली. दोन्हीही सलामीवीर फलंदाजांनी पहिल्या बळीसाठी 59 चेंडूत 96 धावांची भागीदारी नोंदवली. रोहित शर्मा 37 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 43 धावा करून बाद झाला. कर्णधार बाद झाल्यावर लोकेश राहुलही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. राहुलने 204 च्या स्ट्राईक रेटने 28 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 22 चेंडूत 61 धावांची ताबडतोब फलंदाजी करून ऐतिहासिक खेळी केली. सूर्याच्या खेळीत पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्याच्या आक्रमक खेळीतून दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडाही सुटू शकला नाही. रबाडाच्या एका षटकात त्याने 22 धावा दिल्या. रबाडाने या सामन्यात 4 षटकात एकही बळी न घेता 57 धावा दिल्या.

कगिसो रबाडाशिवाय वेन पारनेलनेही आफ्रिकेची डोकेदुखी वाढवताना 4 षटकांत 54 धावा दिल्या. त्याचवेळी वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने 4 षटकात 49 धावा दिल्या. भारतीय संघाने आपल्या डावात 3 गडी गमावून 237 धावांचा डोंगर उभारला.

दुसरा सामना गुवाहाटीच्या मैदानावर पार पडला, जे मैदान खूप छोटे आहे. भारतीय गोलंदाजांनी देखील शानदार सुरूवात केली. दीपक चहरने पहिले षटक मेडन टाकले, तर दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने कर्णधार टेम्बा बवुमा आणि रिली रोसू यांचा पत्ता कट केला. मात्र त्यानंतर देखील दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 108 चेंडूत 216 धावा ठोकल्या.

भारताच्या दोन गोलंदाजांनी देखील धावांचे अर्शशतक ठोकले. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 62 धावा दिल्या, तर फिरकीपटू अक्षर पटेलने 4 षटकांत 53 धावा देत 1 बळी घेतला. हर्षल पटेलची देखील चांगलीच धुलाई झाली. त्याने 4 षटकात 45 धावा दिल्या. त्याला एकही बळी पटकावता आला नाही. अशा प्रकारे या सामन्यात 4 गोलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा दिल्या.

आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ 9 वेळा असे घडले आहे, जेव्हा एका सामन्यात 450 हून अधिक धावा झाल्या आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात सर्वाधिक धावा झाल्याचा विक्रम आहे. 2016 मध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी एकूण 489 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाचा एका धावेने पराभव झाला होता.