Yuzvendra Chahal Insta Story: टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट घेत आहे. कोरोना काळात २०२० मध्ये त्याने डान्सर, कोरियोग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिच्याशी लग्न केले होते. अतिशय कमी वेळ एकमेकांना ओळखत असलेल्या या दोघांनी झटपट लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरुवातीच्या अडीच-तीन वर्षांत दोघे खूप रोमँटिक पद्धतीने एकमेकांना साथ देत होते. पण गेल्या वर्षभराच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या. काही रिपोर्ट्सनुसार, २० फेब्रुवारीला दोघांनी अधिकृतरित्या मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर या दोघांशी सुमारे ४५ मिनिटे काउन्सेलरने चर्चा केली आणि मग या दोघांनी अर्जावर सह्या करून घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली. या चर्चा सुरु असतानाच, युजवेंद्र चहलने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीवरून त्याने धनश्रीवर निशाणा साधल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात या दोघांनी अधिकृतरित्या अर्ज दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांच्या घटस्फोटाचे कारण नात्यातील सामंजस्याचा अभाव असे सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात दोघांनी आपल्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल पूर्णपणे मौन बाळगलं आहे. अद्यापही ते मौन कायम आहे. पण सोशल मीडियावरून हे दोघे आपापल्या परीने व्यक्त होत असतात. चहलनेही रविवारी, २३ फेब्रुवारीला एक स्टोरी शेअर केली. "एखाद्यामध्ये तुमचं महत्त्व समजून घेण्याची कुवत नसेल तर त्याने तुमची किंमत कमी होत नाही," असे वाक्य त्याने पोस्ट केले. दिवंगत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे हे उद्गार असल्याचेही यात सांगण्यात आले आहे. पण सोशल मीडिया युजर्स आणि चहलचे चाहते मात्र हा धनश्रीवर साधलेला निशाणा असल्याचा दावा करत आहेत.
दरम्यान, धनश्री आणि चहल यांचे २२ डिसेंबर २०२० ला लग्न झाले. लग्नानंतर हे दोघे अनेक रील्स, डान्स व्हिडिओ यामुळे कायम चर्चेत असयाचे. केवळ सोशल मीडियाच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही हे दोघे एकमेकांसोबत असायचेय IPL सामने असोत किंवा टीम इंडियाचे सामने असोत, धनश्री नेहमी स्टेडियममध्ये चहलला सपोर्ट करायला हजर असायची. पण गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. त्यानंतर अखेर २० फेब्रुवारीला या दोघांनी ऑफिशियली घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेत चहल धनश्रीला ६० कोटींची पोटगी देणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. परंतु याबाबत कुणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.