WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथ्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील लढती नवी मुंबई येथील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद मिळवल्यामुळे मागील तीन हंगामाच्या तुलनेत यंदाच्या WPL स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षक गर्दी करताना दिसते. पण आता WPL सुरुवात ९ जानेवारी रोजी झाली. आतापर्यंत ४ सामने खेळले गेले असून, पहिल्याच सामन्यापासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या स्पर्धेतील काही सामन्यांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या आठवड्यातील WPL सामना प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार, कारण...
WPL 2026 स्पर्धेतील या आठवड्यातील एक सामना प्रेक्षकांविना खेळवला जाणार हे निश्चित आहे. त्या दिवशी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. एवढेच नाही तर आणखी दोन सामन्यासंदर्भातही संभ्रम आहे. महापालिकेच्या निवडणुकीमुळे १५ जानेवारीचा सामना प्रेक्षकांविना खेळवला जाईल. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यामुळे WPL सामन्यांसाठी स्टेडियममध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था देणं कठीण होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास
पोलिसांनी BCCI ला दिली माहिती, पण...
ESPNcricinfo च्या अहवालानुसार, पोलिसांनी BCCI ला कळवले आहे की, ज्या दिवशी WPL सामना आणि निवडणूक एकाच दिवशी असतील, त्या दिवशी ते पुरेशी सुरक्षा देऊ शकणार नाहीत. मात्र, निवडणुकीच्या आधी आणि नंतर म्हणजेच १४ आणि १६ जानेवारी रोजी होणारे सामनेही प्रेक्षकांविना खेळवले जातील का? याबाबत अजूनही अधिकृत स्पष्टता नाही. सध्या WPL च्या अधिकृत ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर १४, १५ आणि १६ जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यांची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. हीच स्थिती कायम राहिल्यास, या तिन्ही सामन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सामन्यांचे वेळापत्रक:
- १४ जानेवारी: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
- १५ जानेवारी: मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
- १६ जानेवारी: गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू