WPL 2026 Highest Run Scorer Indian Players : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला WPL 2026 च्या चौथ्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. पण छोट्याखानी खेळीसह तिने महिला प्रीमियर लीगमध्ये नंबर वनचा डाव साधला आहे. हरमनप्रीत कौर WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक धावा करणारी बॅटर ठरली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरमनप्रीत कौर अन् शेफाली वर्मा यांच्यात स्पर्धा
नवी मुंबईत आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरनं १७ चेंडूत २० धावांची खेळी केली. या खेळीसह तिने शेफाली वर्माचा विक्रम मोडीत काढला. हरमनप्रीत कौरच्या नावावर आता WPL मध्ये ८७१ धावा आहेत. त्यापाठोपाठ शेफाली वर्माचा नंबर लागतो. तिने ८६५ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात या दोघींमध्ये नंबर वनसाठी स्पर्धा पाहायला मिळेल. टीम इंडियाची क्विन स्मृती मानधना या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसते.
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
स्मृती मानधनाच्या खात्यात किती धावा?
WPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय बॅटरच्या यादीत स्मृती मानधना ६६४ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तिच्या नेतृत्वाखालील RCB च्या संघाने विजयी सलामी दिली असली तरी १८ क्रमांकाची जर्सी घालून मिरवणारी स्मृती या सामन्यात फक्त १८ धावांवर बाद झाली होती.
WPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ३ फलंदाजांमध्ये परदेशी खेळाडूंचा जलवा
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सची नॅट सायव्हर-ब्रंट हिच्या नावावर आहे. WPL मध्ये १००० धावांचा पल्ला गाठणारी ती पहिली आणि एकमेव बॅटर आहे. या यादीत एलिसा पेली ९७२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या हंगामातून तिने माघार घेतली आहे. मेग लेनिंग ९५२ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर असून यंदाच्या हंगामात टॉपर होण्याची संधी असेल.