WPL 2026 Grace Harris And Smriti Mandhana Hit Show RCB Script Biggest WPL Win : महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने यूपी वॉरियर्स विरुद्ध ९ विकेट्स आणि ४७ चेंडू राखून विक्रमी विजय नोंदवला. WPL च्या इतिहासातील RCB चा हा सर्वात मोठा विजय ठरला. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने गुणतालिकेत अव्वलस्थानही मिळवले आहे.
हॅरिसचा धमाका; स्मृतीचं अर्धशतक अवघ्या ३ धावांनी हुकलं
UP वॉरियर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १४३ धावा करत RCB समोर १४४ धावांचे सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधनाच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुच्या संघाने ७३ चेंडूत सामना संपवला. ग्रेस हॅरिस ४० चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८५ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. शिखा पांडेनं तिची विकेट घेतली. दुसऱ्या बाजूला स्मृती मानधना ३२ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ४७ धावांवर नाबाद राहिली. तिने रिचा घोषच्या साथीनं संघाचा विजय निश्चित केला.
तीन वेळा फायनल खेळणाऱ्या कॅप्टनच्या पदरी सलग दुसरा पराभव
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला सलग तीन वेळा फायनलमध्ये नेणारी मेग लेनिंग ही यंदाच्या हंगामात UP वॉरियर्सचे नेतृत्व करत आहे. पण तिच्या नेतृत्वाखालील संघाला सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. RCB विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना यूपी संघातील आघाडीच्या फलंदाजीनं निराश केले. ५० धावांत अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर दीप्ती शर्मानं ३५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने ४५ धावांची नाबाद खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला डिआंड्रा डॉटीन हिने ३७ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केलेल्या ४० धावांच्या जोरावर UP च्या संघाने १४३ धावा केल्या होत्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटील आणि नादिनी क्लर्क यांनी प्रत्येकी २-२ तर लॉरेन बेलनं एक विकेट मिळवली.