महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथ्या हंगामातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर प्लेऑफ्सचं चित्र स्पष्ट झाले आहे. जेमिमा रॉड्रिग्जचादिल्ली कॅपिटल्स संघाने मेग लेनिंगच्या नेतृत्वाखालील UP वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करत प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. ज्या मेग लेनिंगनं मागील तीन हंगामात दिल्ली कॅपिटल्सला WPL च्या फायनलमध्ये नेलं तिला धक्का देत जेमीच्या कॅप्टन्सीत DC फायनलचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल. त्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एलिमिनेटरमध्ये गुजरात जाएंट्सला पराभूत करावे लागेल. जर दिल्लीनं ही लढाई जिंकली तर WPL च्या फायनलमध्ये दोन जीवलग मैत्रीणी एकमेकींच्या विरोधात भिडताना दिसतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका जागेसाठी तिघांत स्पर्धा अन्...
WPL च्या यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील दिल्ली कॅपिटल्स आणि UP वॉरियर्स यांच्यातील निकालावर मुंबई इंडियन्सचेही प्लेऑफ्सचं भवितव्य ठरणार होते. या सामन्यात UP वॉरियर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १२२ धावा केल्या होत्या. दीप्ती शर्मानं १९ चेंडूतील २४ धावा आणि सिमरन शेख हिने १४ चेंडूत केलेल्या २२ धावांशिवाय तळाच्या फलंदाजीत शिखा पांडेनं १३ चेंडूत केलेली नाबदा २३ धावांची खेळी वगळता अन्य कोणत्याच बॅटरला धमक दाखवता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून मेरिझॅन कॅप हिने सर्वाधिक ३ विकेट्सचा डाव साधला. याशिवाय शिनेल हेन्री (Chinelle Henry) आणि श्री चरणीनं प्रत्येकी २-२ तर मीनू मनी हिने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर! WPLमध्ये जलवा बिखरणारी ही ग्लॅमर क्वीन कोण?
धावांचा यशस्वी पाठलाग करताना जेमीची नाबाद खेळी
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १२३ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ११ धावांवर लिझेल लीच्या रुपात पहिली विकेट गमावली. शेफाली आणि लॉरानं ६४ चेंडूत ७३ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लॉरानं ३६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. शेफालीनं ३३ चेंडूत २९ धावांची भर घातली. कर्णधार जेमिमानं १८ चेंडूत नाबाद ३४ धावा करत संघाच्या विजयात बहुमूल्य वाटा उचलला.
ती जीवलग मैत्रीणीला भिडणार का?
WPL च्या यंदाच्या हंगामात स्मृती मानधनाच्या RCB नं थेट फायनल गाठली आहे. एलिमिनेटरमध्ये गुजरात जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेता RCB विरुद्ध यंदाच्या हंगामात फायनल खेळताना दिसेल. मंगळवारी एलिमिनेटरचा सामना खेळवण्यात येणार आहे. जर दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंतचा इतिहास कायम ठेवत आगेकूच केली तर यावेळी WPL च्या फायनलमध्ये दोन जीवलग मैत्रीणी एकमेकींच्या विरुद्ध भिडताना दिसतील. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली RCB नं एक ट्रॉफी जिंकली आहे. पण दिल्लीची पाटी अजून कोरी आहे. कॅप्टन्सीतील पहिल्याच हंगामात जेमिमा रॉड्रिग्ज इतिहास रचणार का? ते पाहणे उत्सुकतेचे असेल. पण त्याआधी तिला गुजरातविरुद्धच्या सामना जिंकावा लागेल.