Women's World Cup Final: नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये काल(2 नोव्हेंबर) रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियाने अखेर वर्ल्ड कपचे स्वप्न पूर्ण केले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. या विजयानंतर मैदानावर आनंदाचा महापूर उसळला आणि या जल्लोषात माजी दिग्गजही सामील झाल्या.
दीदी, हा कप तुमच्यासाठी....
ट्रॉफी स्वीकारल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व सहकाऱ्यांसोबत मैदानावर जल्लोष साजरा केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हरमनप्रीत आणि इतर खेळाडू माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांना वर्ल्ड कप ट्रॉफी देताना दिसतात. या भावनिक क्षणी हरमनप्रीत म्हणाली, “दीदी, हा कप तुमच्यासाठी....” यादरम्यान, स्मृती मंधानाही भावूक झाली होती.
झूलन गोस्वामींची भावनिक प्रतिक्रिया
भारताची माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडिया एक्स (पूर्वी ट्विटर) वर लिहिले, “हे माझे स्वप्न होते आणि तुम्ही ते पूर्ण केले. शेफाली वर्माच्या 70 धावा आणि दोन महत्त्वाचे बळी, दीप्ती शर्माचे अर्धशतक आणि पाच विकेट्स, अप्रतिम कामगिरी! ट्रॉफी आता आपल्या हाती आहे.”
दोन दशकांचे स्वप्न पूर्ण झाले- मिताली राज
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने एक्सवर भावनिक पोस्ट शेअर करत म्हटले, “दोन दशकांहून अधिक काळ मी हे स्वप्न पाहत होते. आज अखेर ते स्वप्न साकार झाले.2005 च्या वेदनेपासून 2017 च्या संघर्षापर्यंत, प्रत्येक अश्रू, प्रत्येक त्याग आणि प्रत्येक तरुणीचा आत्मविश्वास या क्षणापर्यंत घेऊन आला. तुम्ही फक्त ट्रॉफी नाही जिंकली, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाला जिंकलंत. जय हिंद!”
अंजुम चोप्राही भावूक...
भारताची माजी खेळाडू अंजुम चोप्रा म्हणाली, “या मुलींनी आमची स्वप्ने साकार केली आहेत. भारतीय महिला क्रिकेट एका नव्या आणि शानदार युगात प्रवेश करत आहे.”
Web Summary : Indian women's cricket team won the World Cup, honoring former players like Mithali Raj. Harmanpreet Kaur emotionally dedicated the victory to them, celebrating their contributions to Indian women's cricket. Former players expressed joy.
Web Summary : भारतीय महिला क्रिकेट टीम ने विश्व कप जीता, मिताली राज जैसी पूर्व खिलाड़ियों को सम्मानित किया। हरमनप्रीत कौर ने भावुक होकर यह जीत उन्हें समर्पित की, और भारतीय महिला क्रिकेट में उनके योगदान का जश्न मनाया। पूर्व खिलाड़ियों ने खुशी व्यक्त की।