Women’s Premier League 2023 MIW vs GGW : महिला प्रीमिअर लीग २०२३ ला आजपासून सुरूवात झाली. कियारा अडवाणी, किर्ती सेनॉन आणि एपी ढिल्लोन यांनी त्यांच्या परफॉर्मन्सने WPL च्या उद्धाटन समारोहाला चार चाँद लावले. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या सामन्याने WPL ची सुरुवात होणार आहे. मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीची आमंत्रण दिले आहे. गुजरात जायंट्सचा हा डाव फसला अन् मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने ( MI captain Harmanpreet Kaur) WPL मध्ये पहिले अर्धशतक झळकावण्याचा मान पटकावला.
यास्तिका भाटीया ( १) लगेच माघारी परतल्यानंतर हेली मॅथ्यू व नॅट शिव्हर-ब्रंट या जोडीने डाव सावरला. शिव्हर-ब्रंट २३ धावांवर ( ५ चौकार) माघारी परतली. मॅथ्यूने जोरदार फटकेबाजी करताना ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा चोपल्या. त्यानंतर हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला आणि २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तिला एमेली केरने चांगली साथ दिली होती. हरमनप्रीत ३० चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी करून बाद झाली. केर व पूजा वस्त्राकर यांनी अखेरच्या तीन षटकांत चांगली फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला ५ बाद २०७ धावांचा डोंगर उभा करून दिला.
पूजा ८ चेंडूंत १५ धावा करून माघारी परतली. केर २४ चेंडूत ६ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिली. गुजरातच्या स्नेह राणाने दोन विकेट्स घेतल्या.