गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आटोपलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. भारतीय संघाने ही मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवली होती. या माहिलेत भारताचा एकूण सांघिक खेळ जबरदस्त झाला होता. मात्र या मालिकेतील एकाही सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याला संघात स्थान मिळू शकलं नव्हतं. कुलदीपला एकाही सामन्यात संधी न मिळाल्याची खूप चर्चाही झाली होती. अखेर आता कुलदीप यादवने याबाबत मोठा गौप्यस्पोट केला आहे. तसेच संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबतही मोठं विधान केलं आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि ओमान यांच्यात होणाऱ्या लढतीपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना इंग्लंड दौऱ्यात न मिळालेल्या संधीबाबत कुलदीप यादव याने मोठं विधान केलं. तसेच इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत अंतिम संघामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल आपल्याला कुठलाही पश्चाताप नाही, असे कुलदीपने सांगितले. संघात फलंदाजी सखोल असावी यासाठी गंभीरने माझ्यासोबत सविस्तर चर्चा केली होती. त्यामुळे मला संघात स्थान मिळू शकलं नव्हतं, असेही कुलदीपने स्पष्ट केलं. कधी कधी मी खेळू शकतो, असं मला वाटायचं. मात्र फलंदाजीतील सखोलता आणि संघातील समीकरणांमुळे मला संधी मिळू शकली नाही.
कुलदीप यादव याबाबत पुढे म्हणाला की, याबाबत गौतम गंभीरचे विचार स्पष्ट होते. ही गुणवत्ता किंवा फलंदाजीबाबतची बाब नव्हती. तर परिस्थितीच्या हिशोबाने संघामध्ये समतोल राखण्याचा हा विषय होता. मी या वेळेचा पूर्ण आनंद घेतला. तसेच त्यामधून मी खूप काही शिकलो. जेव्हा तुम्ही खेळत नसता तेव्हा दुसऱ्यांना पाहून अधिक शिकता. इतरांना दोष देणं सोपं आहे. मात्र आपल्यातील उणिवा मान्य करणं आणि त्यावर सुधारणा करणे कठीण आहे, असेही कुलदीप यादवने सांगितले.
कुलदीप यादव याने आतापर्यंत १२ कसोटी सामन्यांमध्ये ५६ बळी टिपले आहेत. तर ११३ एकदिवसीय सामन्यात १८१ आमि ४२ टी-२० सामन्यांत ७६ बळी घेतले आहेत.