लंडनः भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सन्मान केला. आयसीसीनं त्यांच्या हॉल ऑफ फेममध्ये तेंडुलकरच्या नावाचा समावेश केला. हा मान मिळणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू कॅथरीन फित्झपॅट्रीक यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. पण, त्याला हा मान मिळायला इतका उशीर का झाला?
यापूर्वी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये भारताच्या बिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर,
अनिल कुंबळे आणइ राहुल द्रविड यांचा समावेश करण्यात आला आहे. कुंबळे आणि द्रविड हे तेंडुलकर सोबत खेळलेले खेळाडू आहेत, परंतु त्यांना तेंडुलकरच्या आधी हा मान मिळाला आहे.
हॉल ऑफ फेमचा नियम काय सांगतो?
तेंडुलकरला इतक्या उशीरा हॉल ऑफ फेमचा मान मिळण्यामागे एक नियम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाच वर्षांनंतर हा मान एखाद्या खेळाडूला दिला जातो. तेंडुलकरने 14 नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. पण, कुंबळे आणि द्रविड यांनी त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. द्रविडने 24 जानेवारी 2012, तर कुंबळेने 29 ऑक्टोबर 2008 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळे हॉल ऑफ फेमसाठी ते प्रथम पात्र ठरले.
हॉल ऑफ फेमचा मान मिळालेले भारतीय खेळाडूबिशन सिंग बेदी ( 1979 निवृत्ती), 2009
कपिल देव ( 1994 निवृत्ती), 2009
सुनील गावस्कर ( 1987 निवृत्ती), 2009
अनिल कुंबळे ( 2008 निवृत्ती), 2015
राहुल द्रविड ( 2012 निवृत्ती), 2018
सचिन तेंडुलकर ( 2013 निवृत्ती), 2019
आतापर्यंत 87 खेळाडूंचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक 28 खेळाडू हे इंग्लंडचे आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया ( 26) आणि वेस्ट इंडिज ( 18) यांचा क्रमांक येतो. भारत ( 6), पाकिस्तान ( 5), न्यूझीलंड ( 3), दक्षिण आफ्रिका ( 3) आणि श्रीलंका (1) या देशांतील क्रिकेटपटूंनाही गौरविण्यात आले आहे.
कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 34,357 धावा केल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
ICC Hall of Fame: Sachin Tendulkar