बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथा दिवसाच्या अखेरच्या सत्रातील तासाभराच्या खेळात जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपनं हवा केली. फॉलोऑनची टांगती तलवार लटकत असताना दोघांनी सुरेख फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर पाणी फेरलं.
आकाशदीपनं चौकार मारला; कोहली-गंभीरचा आनंद गगनात मावेना!
आकाशदीपच्या भात्यातून एक खणखणीत चौकार निघाला अन् भारतीय संघाची नामुष्की टळली. हा चौकार भारतीय चाहत्यांसह ड्रेसिंग रुममधील वातावरण प्रफुल्लित करणारा ठरला. स्टार बॅटर विराट कोहली आणि कोच गौतम गंभीर यांनी तर मॅच जिंकल्याच्या तोऱ्यातच आनंद व्यक्त केला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघ १९३ धावांनी पिछाडीवर आहे. पण या जोडीनं फॉलोऑनची नामुष्की टाळून टीम इंडियाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढलं आहे. त्यामुळे कोहली-गंभीरसह भारतीय ड्रेसिंग रुममध्ये खास माहोल पाहायला मिळाला.
जड्डूची विकेट घेत पॅट कमिन्सनं वाढवलं होतं टीम इंडियाच टेन्शन
ब्रिस्बेनच्या मैदानातील गाबा कसोटी सामन्यात आघाडीच्या फंलदाजांनी नांगी टाकल्यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा अडचणीत सापडली होती. चौथ्या दिवशी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या आश्वासक अर्धशतकामुळे टीम इंडियाचा डाव सावरला. पण पॅट कमिन्सनं जड्डूची विकेट घेत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं.
आकाशदीप-बुमराह जोडी जमली अन् नामुष्की टळली
आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह ही टीम इंडियाची अखेरची जोडी मैदानात असताना भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी ३३ धावांची गरज होती. ही एक विकेट अन् घेत ऑस्ट्रेलियनं संघ सामना जिंकून मालिकेतील आघाडी २-१ अशी करण्याचा प्रयत्नात होता. दुसरीकडे फॉलोऑन टाळला तर पराभव टाळता येईल, या आशेनं ही जोडी टिकणं टीम इंडियासाठी गरजेचे होते. शेवटची विकेट असल्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येकजण चिंतातूर झाला होता. बुमराह-आकाशदीप ही जोडी जमली अन् ड्रेसिंग रुममधील चिंताच दूर झाली. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ही जोडी किती धावा करणार यापेक्षा त्यांनी केलेल्या दमदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार हे स्पष्ट झाले. जर ही जोडी बाद झाली असती तर ऑस्ट्रेलियानं फॉलोऑन देत टीम इंडियाची कोंडी केली असती. पण आता हा सामना अनिर्णित राहण्याकडे झुकताना दिसतोय. भारतीय संघ ज्या परिस्थितीत सापडला होता ते पाहता सामना अनिर्णित राखणे हे देखील सामना जिंकल्याप्रमाणेच आहे.