Join us

IND vs SA Test, Virat Kohli Fitness: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत 'कमबॅक' करू शकेल? राहुल द्रविडने दिली महत्त्वाची अपडेट

दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून अचानक विराट कोहलीने माघार घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 12:09 IST

Open in App

भारतीय संघाने पहिली कसोटी दणक्यात जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र आफ्रिकेने बरोबरी साधली. नियमित विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले. पण भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर आफ्रिकेपेक्षा कमीच पडला. आफ्रिकेला चौथ्या डावात २४० धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन कर्णधार डीन एल्गरने नाबाद ९६ धावा खेळत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाची आक्रमकता कमी पडली असा सूर सामन्यानंतर सोशल मीडियावर दिसून आला. तसेच, विराट कोहलीची कमी जाणवल्याचेही अनेक नेटकऱ्यांनी म्हटले. दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून अचानक विराट कोहलीने माघार घेतली होती. त्यानंतर आता तिसऱ्या कसोटीत विराट खेळणार का? याबद्दलच्या चर्चा रंगल्या असताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेच याचं उत्तर दिलं.

"विराट कोहली लवकरच पूर्णपणे फिट होईल असा अंदाज आहे. त्याला धावपळ करायला आणि व्यायामाला थोडा जास्त कालावधी मिळाला आहे. केपटाऊनला जाऊन दोन सराव सत्रात खेळला की विराट अधिक फिट होईल. मी विराटसोबत सतत संपर्कात आहे. त्याच्या तंदुरूस्तीबाबत मी त्याच्याशी बोलतोय. पण चार दिवसात विराट नक्कीच फिट होईल", अशी माहिती राहुल द्रविडने दुसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विराट कोहलीची या मालिकेतील आतापर्यंतची कामगिरी यावरही द्रविडला प्रश्न विचारण्यात आला. "आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं हे आव्हानात्मक आहे. आफ्रिकेचे फलंदाजदेखील आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. दुसऱ्या सामन्यातील चौथा डाव ही आफ्रिकन फलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजीत सुधार आणण्यासाठी भारतीय खेळाडूंनी थोडी मेहनत घेणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या भागीदारी करण्यावर त्यांनी भर द्यायला हवा", असे द्रविड म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीराहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App