Virat Kohli on T20I retirement: टीम इंडियाचा धमाकेदार फलंदाज विराट कोहली सध्या IPLमध्ये खेळत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये विराटने तुफान फटकेबाजी करत भरपूर धावा केल्या आहेत.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळताना विराटने ११ सामन्यांमध्ये ७ अर्धशतकांच्या साथीने ५०५ धावा केल्या आहेत. विराटची IPL मधील कामगिरी पाहून सारेच अवाक् आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेण्यास घाई केली, असेही अनेकांचे मत आहे. पण टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट T20Iमधून निवृत्त का झाला, याचा विराटने उलगडा केला. आरसीबी बोल्ड डायरीज पॉडकास्टमध्ये विराट बोलत होता.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सोडण्याची घाई झाली का?
"टी२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घाई झाली असे मला अजिबात वाटत नाही. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सोडण्याचा निर्णय हा पूर्णपणे विचार करून घेण्यात आला होता. मी जेव्हा खेळत होतो, त्यावेळी नव्या दमाचे खेळाडू टी२० क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज होते आणि आमच्यापेक्षा जास्त फिट होते. त्यामुळे पूर्णपणे विचार करूनच निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पुढल्या टी२० विश्वचषकाच्या आधी त्या खेळाडूंना पुरेसा वेळ मिळणे गरजेचे होते. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांना खेळ समजण्यासाठी मदत होईल, असा यामागचा विचार होता. म्हणजेच पुढल्या वर्ल्डकपच्या आधी जगाच्या विविध कोपऱ्यांमध्ये हे खेळाडू जातील, प्रवास करतील, खेळू शकतील आणि त्यांना अपेक्षित तो अनुभव मिळेल. या विचारातूनच मी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झालो," असे विराटने स्पष्ट केले.
भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय कठीण होता, पण...
"माझ्यासाठी कर्णधारपद खूप कठीण झाले. माझ्या कारकिर्दीत मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की, मला क्रिकेटवरह लक्ष केंद्रित करता येत नव्हते. मला खूप संघर्ष करावा लागला. मी नेहमी त्याचाच विचार करायचो. मी २०२२ मध्ये एक महिन्याचा ब्रेक घेतला आणि या काळात बॅटला हातही लावला नाही. त्यावेळी मला असे वाटू लागले की, खेळात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मी कर्णधारपदातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला," असेही विराट म्हणाला.