Join us

फिरकीचा जादूगार TOP 5 मध्ये! ICC T20 क्रमवारीत भारताच्या वरुण चक्रवर्तीची २५ स्थानांची झेप

Varun Charavarthy ICC T20 Rankings, Ind vs Eng 3rd T20 : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या तीन T20 सामन्यांत वरुण चक्रवर्तीने घेतले १० बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:08 IST

Open in App

Varun Charavarthy ICC T20 Rankings, Ind vs Eng 3rd T20 : इंग्लंड विरूद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन केले. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी सामन्यात पाच बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला सामनावीर निवडण्यात आले. तसेच पहिल्या दोन सामन्यातही त्याने दमदार कामगिरी केली. या कामगिरीचे त्याला फळ मिळाले. ICC ने T20 गोलंदाजांची नवीन क्रमवारी जाहीर केली. त्यात वरुण चक्रवर्तीने २५ स्थानांची झेप घेत टॉप 5 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.

वरुण चक्रवर्तीची मोठी झेप

वरुण चक्रवर्ती ताज्या ICC T20 क्रमवारीत ६७९ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. वरुण चक्रवर्ती वगळता इतर कोणताही खेळाडू टॉप 5 मध्ये जागा मिळवू शकलेला नाही. टॉप 10 च्या यादीबाबत बोलायचे झाल्यास, वरूण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांची नावे यादीत आहेत. अर्शदीप सिंग नवव्या स्थानी तर रवी बिश्नोई १०व्या स्थानी विराजमान आहे

इंग्लंडचा आदिल रशीद अव्वलस्थानी कायम

टी२० गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या क्रमांकावर आहे. या इंग्लिश फिरकीपटूचे ७१८ रेटिंग गुण आहेत. तर वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन ७०७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा तिसऱ्या स्थानावर असून त्याचे ६९८ रेटिंग गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा ॲडम झम्पा ६९४ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. म्हणजेच टी२० गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येत आहे.

तिलक, हार्दिकदेखील चमकले

वरुण चक्रवर्ती शिवाय आणखी एका भारतीय खेळाडूने आयसीसी क्रमवारीत झेप घेतली आहे. तिलक वर्मा ICC टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. तिलक वर्मा ८३२ रेटिंग गुणांसह दुसरा फलंदाज आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या पहिल्या क्रमांकावर कायम आहे. राजकोट टी२० मधील भारताच्या पराभवानंतर हार्दिक पांड्यावर बरीच टीका झाली होती, पण तरीही तो आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५टी-20 क्रिकेटआयसीसीहार्दिक पांड्यातिलक वर्मा